ठाणे : ठाणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीला पर्याय म्हणून ठाणे महापालिकेने आखलेल्या १२ हजार २०० कोटींच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पास केंद्र सरकारने काही महिन्यांपुर्वी हिरवा कंदील दाखविला होता. त्यापाठोपाठ आता या प्रकल्पाकरीता कर्ज घेण्यास राज्याच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे.
ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने १२ हजार २०० कोटींचा अंतर्गत मेट्रो प्रकल्प आखला होता. या बहुचर्चित प्रकल्पास केंद्र सरकारने अखेर हिरवा कंदील दाखविला होता. या प्रकल्पाचा आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ने तयार केला असून, ठाणे महापालिकेच्या सहकार्याने प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या मेट्रोची सुरूवात २०२९ पर्यंत होणार असून या प्रकल्पामुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि गतिमान होणार आहे.
शहरातील अंतर्गत भागासाठी पालिकेने सहा डब्यांची मेट्रो प्रकल्पाची आखणी केली होती. परंतु मोठ्या शहरांमध्ये सहा डब्यांची मेट्रो तीन मिनिटांच्या अंतराने चालविण्यात येते. यामुळे ठाण्यात तीन डब्यांची मेट्रो दीड मिनिटांच्या अंतराने चालवावी अशी सूचना केंद्राने केली होती. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सहा डब्यांची मेट्रो गरजेची असल्याचे मत मांडले होते. अखेर केंद्र सरकारने हा मुद्दा मान्य करत सहा डब्यांच्या मेट्रोवर शिक्कामोर्तब करून प्रकल्पाला हिरवा कंदील दिला होता.
कर्ज उभारणीस मंजुरी
राज्य मंत्रीमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प यासह पुणे आणि नागपूर मेट्रोच्या विविध टप्प्यांसाठी घेण्यात येणाऱ्या बाह्य सहाय्यित कर्जासाठी आकस्मिक दायित्व स्वीकारण्यास राज्य मंत्रीमंडळाने बैठकीत मान्यता दिली आहे. तसेच प्रकल्पांचे करारनामा, कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यासही मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता अधिक वेग येणार असून, २०२९ पर्यंत मेट्रो मार्ग सुरु होण्याची अपेक्षा आहे.
असा आहे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प
एकूण २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग हा उन्नत असून ३ किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. प्रकल्पांर्गत एकूण २२ स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत. अंदाजे ७.६१ लाख प्रवाशांना दररोज या मेट्रो रेल्वे सेवेचा लाभ होणार असून २०२९ पर्यंत मेट्रोची सुरुवात होईल. ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत आदी भाग या मेट्रो रेल्वे सेवेने जोडला जाणार असल्याने प्रवाशांचा गतिमान आणि सुरक्षित प्रवास होणार आहे.