डोंबिवली : डोंबिवलीतील नवउद्योजक (नवउद्यमी-स्टार्टअप) मिहिर मुकुंद देसाई यांची नेपाळ येथे २७ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत होणाऱ्या जागतिक युवा महोत्सवासाठी महोत्सवातील युवा नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष अतिथी म्हणून निवड झाली आहे. मिहिर देसाई हे मागील तीन वर्षापासून भरडधान्य प्रक्रिया उद्योगात प्रभावीपणे काम करत आहेत. त्यांच्या या उद्योग व्यवसायातील माहिती नवउद्योजकांना मिळावी यासाठी मिहिर यांना युवा महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. डोंबिवली निवासी असलेले मिहिर देसाई हे भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आहेत.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चळवळीतील ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक आहेत. भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद उर्फ भाई देसाई यांचे ते चिरंजीव आहेत. नेपाळमधील कावरेपल्लानचोक येथे ही जागतिक युवा परिषद भरत आहे. या परिषदेसाठी ७५ हून अधिक देशांमधील प्रतिभाशाली युवा नवउद्योजक, नवउद्यमी (स्टार्टअप), युवा संशोधक, विद्यार्थी, कलाकार, युवा मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. या जागतिक युवा महोत्सवातील ‘कृषी आणि अन्न सुरक्षा’ विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक युवा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा समन्वयक समितीचे प्रमुख दीपक कुमार गौतम यांनी मिहिर देसाई यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे.

मागील काही वर्षापासून केंद्र सरकारने नवउद्यमींनी अधिकाधिका व्यवसाय सुरू करावेत. या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी. नवउद्योजकांच्या उद्योग, व्यवसाय विषयक कौशल्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून नवउद्यमींना आर्थिक पाठबळ, त्यांना मार्गदर्शनासाठी परिषदा आयोजित केल्या आहेत. सुदृढ आरोग्यासाठी आपली जुन्या काळातील भरडधान्य ही आरोग्यासाठी किती पोषक आहेत. या माध्यमातून केंद्र सरकाने भरडधान्याच्या प्रचार प्रसारासाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत.

या विविध उपक्रमातून भारत देशाच्या विविध भागात अनेक नवउद्यमी सक्रिय आहेत. अशा नवउद्यमींसाठी नेपाळ येथील जागतिक युवा महोत्सव ही एक पर्वणी आहे. मिहिर देसाई हे आठ वर्षापूर्वी रशियातील सोची येथे पार पडलेल्या जागतिक युवा आणि विद्यार्थी महोत्सवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.
नेपाळ येथील युवा महोत्सवासाठी डोंबिवलीचे मिहिर देसाई यांची विशेष अतिथी म्हणून निवड झाल्याने त्यांचे उद्योग, नवउद्यमी क्षेत्रातून स्वागत केले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेपाळ येथील जागतिक युवा महोत्सवाच्या माध्यमातून जगात उद्योग, व्यवसायात काय सुरू आहे याची माहिती मिळेल. माहितीची देवाणघेवाण होते. नवउद्योजक, नवउद्यमींना अशा परिषदा म्हणजे एक माहितीचे महाजाल आणि एक पर्वणी असते. या परिषदेत विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा नवउद्यमींसाठी चांगला उपयोग केला जाईल. मिहिर देसाई नवउद्यमी, डोंबिवली.