रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रीया विभागाची उभारणीचेही आदेश

ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचवावा आणि या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढावा, या उद्देशातून सर्वच ठिकाणी अत्याधुनिक शाळांची निर्मिती करण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्याच्या धर्तीवर अशा शाळांची निर्मिती करण्यात येणार असून त्याठिकाणी शाळांचा चेहरा-मोहरा बदलून विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. अशा शाळांची निर्मीती करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून त्याचबरोबर जिल्ह्यातील रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय आणि आरोग्य केंद्रात अत्याधुनिक शस्त्रक्रीया केंद्राची उभारणीचेही आदेशही त्यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात हवेचा दर्जा खालावलेलाच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून माहिती देण्यास टाळाटाळ

सांगली जिल्ह्यामधील जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येत आहेत. यामु‌ळे या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या निकालाचा दर्जा सुधारला असून त्याचबरोबर या शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी पालकांची गर्दी होऊ लागली आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या शाळा आहेत. या शाळांच्या नुतनीकरण तसेच इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. या निधीचा उपयोग शाळांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करण्यासाठी होत नसल्याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. सांगली जिल्ह्याच्या धर्तीवर अत्याधुनिक शाळांची निर्मिती करण्यात आली तर, त्या शा‌ळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल आणि या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढेल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करण्यात यावी, असे आदेश देसाई यांनी बैठकीत दिले. यंदा उपलब्ध झालेल्या निधीतून काही शाळांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करावी आणि ‌उर्वरित शाळांची पुढच्या वर्षी प्राप्त होणाऱ्या निधीतून अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा >>> ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे सत्र सुरू, मुंब्रा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याची १० महिन्यांतच बदलीमुळे राजकीय चर्चांना उधाण

अत्याधुनिक शस्त्रक्रीया विभागाची उभारणी ठाणे जिल्ह्यात तीन जिल्हा रुग्णालये, एक महिला रुग्णालय, चार उपजिल्हा रुग्णालय, सहा ग्रामीण रुग्णालये आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणीच आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी या रुग्णालयांची उभारणी करण्यात आलेली आहे. असे असले तरी याठिकाणी शस्त्रक्रीया विभाग नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. कैलास पवार यांनी ठाणे, भिवंडी आणि शहापूर या ठिकाणी अत्याधुनिक शस्त्रक्रीया विभागाची उभारणी केली. त्यापाठोपाठ मुरबाड, गोवेली, बदलापूर, अंबरनाथ या रुग्णालयामध्येही अशाचप्रकाराचा विभाग तयार करण्याचे काम सुरु आहे. उर्वरित खर्डी आणि टोकावडे भागात मात्र हे काम प्रस्तावित होते. बुधवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय पटलावर येताच पालकमंत्री देसाई यांनी अत्याधुनिक शस्त्रक्रीया विभागाच्या कामांचा आढावा घेतला आणि उर्वरित खर्डी आणि टोकावडे भागातही अशाचप्रकारे सुविधा निर्माण करण्याचे आदेश दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister shambhuraj desai s order administration for construction of modern schools in thane district zws
First published on: 08-02-2023 at 16:11 IST