ठाणे : अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलेला ‘पॉक्सो’ (POCSO) कायदा हा लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी आहे. परंतु, या कायद्याचा काहीजण वैयक्तिक वाद मिटवण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी गैरवापर करीत असल्याचा दावा ठाण्यातील समाजसेवक अजय जया यांनी केला आहे.

खोट्या तक्रारींच्या माध्यमातून निरपराध व्यक्तींना त्रास देणे, समाजात त्यांची बदनामी करणे आणि शेवटी पैशांची उकळणे, अशा टोळ्या शहरात कार्यरत असल्याचा दावाही त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलेल्या ‘पॉक्सो’ कायद्याचा गैरवापर करून निरपराध नागरिकांना अडकविणाऱ्या घटनेत वाढ होत असल्याचे समोर येत आहे.

काही व्यक्ती या कायद्याचा गैरवापर करून खोट्या तक्रारींच्या माध्यमातून पैसे उकळण्याचे किंवा वैयक्तिक वाद मिटविण्याचे काम करीत असल्याची तक्रार नागरिकांकडून येत आहेत. अशा प्रकारच्या टोळ्याच शहरात सक्रीय झाल्याचा दावा करत त्याविरोधात आवाज उठवून निरपराध व्यक्तींना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचा पुढाकार घेतला असल्याचे अजय जया यांनी म्हटले आहे. अल्पवयीन मुलांचे रक्षण हे या कायद्याचे मूळ उद्दिष्ट आहे. मात्र त्याच कायद्याचा वापर जर खोट्या आरोपांसाठी होऊ लागला, तर ते केवळ कायद्याचा अपमान नाही, तर समाजातील विश्वासालाही धक्का आहे, असे जया यांनी सांगितले.

ठाण्यामध्ये फसवणूक करणारी काही टोळी सक्रिय आहेत, जे अल्पवयीन बालकांच्या सुरक्षेसाठी बनवलेल्या ‘पॉक्सो’ कायद्याचा गैरवापर करून निरपराध व्यक्तींना त्रास देतात आणि खोट्या तक्रारींमधून पैसे उकळतात किंवा वैयक्तिक वाद मिटवतात. अशा फसव्या लोकांपासून सावध रहा आणि त्यांच्या विरोधात तक्रार करा. आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला कायदेशीर मदत करू, असे जया म्हणाले. अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेल्यांना सहा सहा महिने जामीन मिळत नाही आणि त्यांच्या मदतीसाठी कोणीही पु़ढे येत नाही.

परंतु काही वेळेस पैसे उकळण्यासाठी असे गुन्हा दाखल केला जातात आणि काही टोळ्याच तक्रारदारांना असे गुन्हे दाखल करण्याचे सल्ले देतात. गुन्हा दाखल झाल्यावर अशाप्रकरणात निरापराधांना त्रास होतो. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ नये म्हणून अनेकजण पैसे देऊन सुटका करून घेतात. त्यामुळे अशाप्रकारची प्रकरणे पोलिस ठाण्यात येतात. त्यावेळेस पोलिसांनी प्रथमदर्शनी पुरावे तपासूनच कार्यवाही करायला हवी, असे जया म्हणाले.

पॉक्सो कायद्याचा गैरवापर थांबवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. या कायद्याची खरी उद्दिष्टे समजून घेणे आणि त्याचा जबाबदारीने वापर करणे हे समाजातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. निरपराध व्यक्तींना अडकवणे म्हणजे त्यांच्या आयुष्यावर अन्याय करणे आहे. जर कोणी अशा फसव्या प्रकरणांचा बळी ठरले असेल किंवा अशा खोट्या तक्रारींच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात असतील, तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. त्यांना कायदेशीर मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध करून देऊ. अशा फसव्या लोकांपासून सावध रहा आणि त्यांच्या विरोधात तक्रार करा. आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला कायदेशीर मदत करू, असे जया म्हणाले.