ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ लाखांची लाच घेताना अटक केली असून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार, प्रमोशनमधील गैरव्यवहार, पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. ते म्हणाले, ” २५ लाखांची लाच घेताना पकडलेला अधिकारी प्रमोशन कसं घेतो? त्याची दोन वेळा चौकशी झाली, त्याचं काय झालं? शासनातून आलेले अधिकारी ठाण्यात येतात आणि शासनात परतच जात नाहीत. त्यांना ठाण्यातलं कोणतं श्रीखंड पुरी एवढं आवडतं.”
“ठाणं पुण्यापेक्षाही पुढं गेलं भ्रष्टाचारात!”
आपला एक वरिष्ठ अधिकारी २५ लाखांची लाच घेताना पकडला जातो. एवढ्या गंभीर आरोपांनंतरही त्याला प्रमोशन देण्यात आलं होतं. नगरविकास विभागाने ठाणे महापालिकेच्या प्रमोशन पॉलिसीवर श्वेतपत्रिका काढली पाहिजे. पुणे भ्रष्टाचारात पुढे कोणी असं म्हणत असेल, पण ठाणं त्याही पुढे गेलंय.”, असे आव्हाड म्हणाले. महापालिकेत आवडीचे अधिकारी आवडीच्या जागी वर्षोनुवर्ष बसवले जातात. जे अधिकारी आवडतात, त्यांनाच महत्त्वाच्या पदांवर बसवलं जातं, असा घणाघात आव्हाड यांनी केला.
हायकोर्ट आदेश, तरीही बांधकाम सुरूच
आव्हाड यांनी ठाण्यातील बेकायदेशीर बांधकामांवरही तीव्र संताप व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे कोर्टातील न्यायाधीशांमार्फत काही गंभीर प्रश्न विचारले होते आणि त्याची उत्तरं प्रशासनाने दिलीही. पण त्याच काय झालं. येऊर मध्ये बंगले बांधले गेले, त्यांचा कर्ताकरविता कोण आहे हायकोर्टाने ऑर्डर देऊनही बांधकाम सुरू आहे. अधिकारी एवढे निर्ढावले आहेत की, न्यायालयाचे आदेशसुद्धा पायदळी तुडवतात. डोंगर पोखरून बंगला बांधला गेलाय, कोण विचारते, आम्हाला मतं मिळतात, आम्ही निवडून येतो, बस विषय संपला, अशी संतप्त प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.