लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे: महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच, मुंब्र्यात दोन महिन्यात आठ मजली बेकायदा इमारतींची उभारणी केली जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या भागातील ५० तरुण एकत्र येऊन तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याबाबत त्यांनी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. उद्या मुंब्रा परिसरातील तरुण मुलांनी सगळीकडून बंड केले तर मात्र परिस्थिती अवघड होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंब्रा परिसरातील शमशाद नगर उभारण्यात येत असलेल्या बेकायदा बांधकामांबाबत माहितीचा एक संदेश आमदार आव्हाड यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. मुंब्रा येथील शमशाद नगर मधील तरुण मुलांनी माझी भेट घेतली. शमशाद नगरच्या आजूबाजूला उभ्या राहत असलेल्या अनधिकृत इमारतींबद्दल त्यांनी तक्रार केली. दोन-दोन महिन्यात आठ-आठ मजल्याच्या इमारती उभ्या केल्या जात आहेत. यामुळे शमशादनगर येथील जुन्या गृहनिर्माण संकुलांना धोका निर्माण होऊ शकतो, असे आव्हाड यांनी संदेशात म्हटले आहे. त्या तरुणांचे म्हणणे होते की आम्ही अनेकवेळा तक्रारी केल्या पण, कोणीही याबाबत दखल घेतली नाही. म्हणून ते माझी भेट घ्यायला आले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… महामार्गावर अपघातामुळे कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही तरुण मुले आता तयार झाली आहेत. अनधिकृत बांधकामांविरोधात ती आता आवाज उचलत आहेत. मुंब्रा परिसरातील एका गृहनिर्माण संकुलातील ५० मुले एकत्र येतात ही विचार करण्यासारखी बाब आहे. उघडपणाने ही तक्रार करणाऱ्या या मुलांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडू नये यासाठी तरी निदान आपण कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत आणि स्वतः त्यामध्ये लक्ष द्यावे एवढीच अपेक्षा, अशी मागणी त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. उद्या मुंब्रा परिसरातील तरुण मुलांनी सगळीकडून बंड केलं तर मात्र परिस्थिती अवघड होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.