लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: महापालिका क्षेत्रात उद्यानांच्या उद्घाटनानंतर दोन ते तीन महिन्यातच त्याची दुरावस्था होत असून या उद्यानांची यादीच मांडत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभारावर टिका केली आहे. या दुरावस्थेला उद्यान विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करत हा विभाग बंद करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर मिरा-भाइर्दर महापालिकेप्रमाणे वार्षिक ठेकेदारामार्फत उद्याने, मैदानांची दुरूस्ती व देखभाल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

ठाणे महापालिकेचे आर्थिक उत्पन्न अतिशय चांगले नाही. आयुक्त अभिजीत बांगर हे करोडो रूपायांचे कर्ज फेडून पालिकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा आणत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराच्या सुशोभिकरणासाठी करोडो रूपयांचा निधी दिलेला आहे. राज्य शासनाने दिलेल्या निधीचा आयुक्त बांगर हे योग्य प्रकारे वापर करीत असताना, उद्यान विभागाकडून मात्र सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येते. उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ठाणे महापालिकेची वारंवार बदनामी होत आहे, असे आमदार सरनाईक यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… जितेंद्र आव्हाडांच्या मतदार संघात शिंदेंची निधी पेरणी, शिवसेनेचे ‘कळवा-मुंब्रा’ मिशन पुन्हा सुरू झाल्याची चर्चा

ठाणे शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून उद्यानांचे उद्घाटन केल्यानंतर त्यांच्या दोन-तीन महिन्यानंतरच त्यांची दुरावस्था झालेली आढळून येत आहे. महापालिकेच्या इतर उद्यानाच्या दुरावस्थेबरोबरच मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या कळवा येथील स्व. उत्तमराव पाटील निसर्ग संरक्षण व जैवविविधता उद्यान तसेच घोडबंदर रोडवरील ’जुने ठाणे नविन ठाणे’ तसेच रूणवाल प्लाझा शेजारील बॉलीवुडच्या थिमपार्कच्या दुरावस्थेकरिता सुध्दा हेच उद्यान विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. करोडो रूपये खर्च करून महापालिका उद्याने उभारते. ठेकेदाराकडून ही उद्याने तयार करून महापालिकेकडे सुपुर्त झाल्यानंतर वर्षभरातच त्या उद्यानामध्ये नागरिकांना जावेसे वाटत नाही, अशी अवस्था होत असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा… राज्यातील ‘आरटीओ’ कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्डचा तुटवडा? वाहन मालक, चालकांच्या कार्यालयात चकरा

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नवीन उद्याने, दुरूस्तीच्या निविदा तसेच विकासकांच्या माध्यमातून झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामांव्यतिरिक्त दुसऱ्या कामांमध्ये म्हणजेच उद्याने आणि मैदानांची योग्य प्रकारे निगा व काळजी घेण्याची इच्छा नसल्याचे जाणवते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नसल्यामुळे आणि कामचुकारपणा वाढल्यामुळे शहरातील उद्यानांची व मैदानांची दुरावस्था झालेली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. एका बाजूला नवी मुंबई महापालिकेची उद्याने सुस्थितीत असताना दुसऱ्या बाजूला ‘ड’ वर्ग महानगरपालिका असलेल्या मिरा-भाइर्दर महापालिकेची उद्याने मात्र सुस्थितीत आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या उद्यानांची आणि मैदानांची निगा व देखभालीची जबाबदारी उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेली नाही. तेथे वार्षिक ठेकेदाराकडून ही उद्याने व मैदाने दुरूस्ती केली जातात. त्याचप्रमाणे ठाण्यातील उद्याने आणि मैदानांची देखभाल व दुरुस्ती केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla pratap sarnaiks letter to municipal commissioner regarding bad condition of grounds including parks in thane dvr
First published on: 26-05-2023 at 19:29 IST