लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी सकाळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी आपल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात धुळवडीचा आनंद लुटला. यावेळी ध्वनीक्षेपकावर वाजविण्यात येणाऱ्या गाण्यांवर काही वेळ आमदार राजेश मोरे यांनी हाताला दुखापत झाली असताना कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ठेका धरला.

डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत हा कार्यक्रम करण्यात आला. आमदार राजेश मोरे आणि जिल्हा महिला संघटक कविता गावंड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. त्यानंतर शाखेसमोर धुळवडीचा कार्यक्रम करण्यात आला. शिवसेनेचे महिला, पुरूष पदाधिकारी या उत्सवी कार्यक्रमात सहभागी झाले होते. ध्वनीक्षेपकावर ठेका धरणारी गाणी लावून त्यावर शिवसैनिक ठेका धरत होते.

रंगाची उधळण करून, एकमेकांना रंग फासून धुळवडीचा आनंद लुटला जात होता. यावेळी उपस्थितांनी आमदार मोरे यांना रंग फासून धुळवडीचा आनंद घेतला. आमदार राजेश मोरे गाण्याच्या तालावर नाचत होते. त्यावेळी त्यांच्या सोबत छायाचित्रे काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्ते, नागरिकांची झुंबड उडाली होती.

गेल्या महिनाभरापूर्वी आमदार मोरे अंबरनाथ येथील दौऱ्यात असताना पाय घसरून पडले. त्यावेळी त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मुंबई रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. दुखापत झालेला हात गळ्यात बांधून आमदार मोरे नागरिकांची कामे करत आहेत. विधीमंडळ अधिवेशनाला उपस्थिती लावत आहेत. शुक्रवारी ते धुळवडीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने कार्यकर्ते उत्साहात होते.