ठाणे : ठाणेसह राज्यातील महापालिका निवडणूका पॅनल पद्धतीने होणार असून या पॅनल पध्दतीमुळे निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. अशातच आता महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव ( Avinash Jadhav) यांनी यावर भाष्य करत पॅनल पद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यातील प्रशासन, राज्य सरकार आणि स्थानिक राजकारणावर जोरदार हल्ला चढवला. राज्यकर्त्यांना स्वतःवर भरोसा नाही. म्हणूनच निवडणुका पॅनल पद्धतीने घेतल्या जात आहेत. जर खरी हिम्मत असेल तर सिंगल वार्ड पद्धतीने निवडणूक लढवावी, मग आम्ही आमचे काम दाखवू. एक चांगला कार्यकर्ता आपल्या विभागात वर्षानुवर्षे काम करत असतो.
पण नवीन पॅनल पद्धती लागू केली जाते. त्याला त्याच्या बाजूच्या वार्डात ओळखत नाहीत, त्यामुळे तो मोडून पडतो. कार्यकर्त्यांना मोडण्याचे, त्यांना संपवण्याचे काम आणि पाप हे सरकारने केले आहे, असे जाधव म्हणाले.
ठाण्याला न्याय देणार आहोत
ठाण्यातील वाढत्या भ्रष्टाचार, रस्त्यांची बिकट अवस्था, वाहतूक कोंडी, पाण्याचा तुटवडा आणि दहशतीचे वातावरण यावरही जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या सर्व समस्यांमध्ये आम्ही लोकांसोबत आहोत. यासाठीच आम्ही मोर्चा काढत आहोत. आता ठाण्यात दहशत चालणार नाही; आम्ही नागरिकांना एकत्र करून ठाण्याला न्याय देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
क्लस्टर योजना निवडणुकीचे गाजर
२०१४ पासून क्लस्टरचं स्वप्न दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. पुढची दहा वर्षे गेली तरी योजनेची पान हलणार नाही. क्लस्टर हे गाजर आहे, निवडणूक आली की ते दाखवलं जातं. धोकादायक इमारतीत किती तरी लोक राहतात, त्यांना क्लस्टरचे लालच देऊन आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो दाखवण्याचा प्रयत्न असतो. मात्र मागचे १० ते ११ वर्षे पाहतोय, क्लस्टरचा क देखील पुढे गेला नाही, असे जाधव म्हणाले.
मुख्यमंत्री मिळाले, पण ठाण्याला काहीच फायदा नाही
ठाण्याचे मुख्यमंत्री झाले होते. पण धरणाचे काम सुरू झाले नाही, कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, वाहतूक कोंडी वाढली आणि घोडबंदरसारख्या भागात पाणी नाही. ठाणेकरांना मुख्यमंत्री मिळाल्याचा कोणताच फायदा झाला नाही, असा आरोप त्यांनी केला.
यापुढे गप्प बसणार नाही
आमच्या कार्यकर्त्यांची हॉटेल किंवा दुकाने तोडून दाखवा, यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. सर्व पक्ष एकत्र येऊन विरोध करणार. आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई केली तर त्यांच्या समोर त्यांच्या १०० कार्यकर्त्यांची यादी घेऊन उभे राहू. राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, विक्रांत चव्हाण आदी नेत्यांसोबत एकत्र येऊन ठाण्याच्या हक्कासाठी लढा देण्यात येईल. आम्ही एकत्र येऊन ठाण्यासाठी लढणार आहोत. आगामी काळात आम्ही ठाण्याच्या रस्त्यावर एकत्र दिसू,” असा इशारा त्यांनी दिला.