Local Body Polls in Maharashtra MNS-MVA News : मुंबई व ठाणे महानगरपालिका निवडणुकीसह आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी राज ठाकरे (मनसे) व उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा) हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहेत. मराठीच्या मुद्यावर हे दोघे भाऊ अलीकडेच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, राजकारणाच्या मैदानात एकत्र येण्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. दोन्ही पक्षांचे नेते शिवसेना (उबाठा) व मनसे एकत्र येण्याबाबत संकेत देत आहेत. खासदार संजय राऊत व मनसे नेते संदीप देशपांडे यामध्ये आघाडीवर आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे व राज ठाकरेंचे पक्ष एकत्र आले तर महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस त्यास विरोध करेल असं बोललं जात होतं. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच स्पष्ट केलं की असा विरोध करण्याचं कारणच नाही. तर, काँग्रेसने यावर मौन बाळगलं होतं. अशातच ठाण्यामध्ये महायुतीविरोधात महाविकास आघाडी व मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक सूचक पोस्ट केली आहे.
आव्हाडांच्या घरी मविआ व मनसे नेत्यांची बैठक
आव्हाड यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडी व मनसे नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. आव्हाड यांनी या बैठकीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या बैठकीला आव्हाड यांच्यासह शिवसेनेचे (उबाठा) माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते.
ठाण्यातील नागरी समस्यांबाबत चर्चा
हा व्हिडीओ पोस्ट करत आव्हाड म्हणाले, “मी, शिवसेनेचे (उबाठा) माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण अशा आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत, नागरी समस्यांबाबत सुमारे तासभर चर्चा झाली. ठाण्यातील वाहतूक कोंडी, डम्पिंग ग्राऊंड, पाणीटंचाई आणि रस्त्यांच्या, मेट्रोच्या कामांमुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांवर या चार नेत्यांमध्ये चर्चा झाली.
युती की आंदोलन? अद्याप साशंकता
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुतीविरोधात मनसे व महाविकास आघाडी एकत्र येण्याचं हे पहिलंच पाऊल आहे. या चार नेत्यांमध्ये आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाली की ठाण्यात मोठ्या आंदोलन उभं करण्याच्या हालचाली चालू आहेत याबाबत अद्याप साशंकता आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये या भेटीचं खरं कारण समोर येईल.
भाजपा व शिंदे गटाची चिंता वाढली
दरम्यान, या भेटीमुळे भाजपा व शिवसेनेची (शिंदे) चिंता वाढली आहे. ठाण्यात मनसे समर्थकांची, कार्यकर्त्यांची व त्यांच्या मतदारांची मोठी संख्या आहे. महाविकास आघाडीला मनसेचं बळ मिळालं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला व भाजपाला मोठा फटका बसू शकतो.