Dahi Handi 2025 ठाणे : ठाण्यातील नौपाडा परिसरातील भगवती शाळेच्या मैदानात दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेचे अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या हंडीत मानवी मनोऱ्यांचा थरार, पारितोषिके पाहायला मिळणार आहे. परंतु यंदा मनसेच्या दहीहंडीत सेलिब्रिटी नसणार त्यामुळे नक्की कशा पद्धतीने यंदाची हंडी असणार आहे. या दहीहंडी मध्ये काय आकर्षण असणार आहे हे अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा, ‘ढाक्कुमाकुम’, ‘ढाक्कुमाकुम’ चा सूर उद्या मुंबई, ठाणेसह उपनगरांमध्ये घुमणार आहे. मागील काही दिवसापासूनच सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर ठाणे शहरातील अनेक ठिकाणी हंड्यांना विविध अभिनेते, अभिनेत्री, लावणी सम्राज्ञी, खेळाडू उपस्थिती असणार आहे. तसेच काही राजकीय नेत्यांनी दहीहंडीसाठी चित्रपटांच्या थीम ठेवल्या आहेत. त्यामुळे या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चुरस रंगणार आहे. मात्र, यंदा ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीचे आकर्षण वेगळे असणार आहे. यंदा हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यभरात मराठी भाषेचा मुद्दा गाजत असताना मनसेने दहीहंडीसाठी एक सूचक पोस्टर प्रसारित केला आहे. त्यामुळे दहीहंडी नेमकी कशा पद्धतीने साजरी केली जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे. दहीहंडीत सेलिब्रिटी नसणार मग नेमके काय असणार असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.
नेमके आकर्षण काय असणार आहे
नौपाडा परिसरातील भगवती शाळेच्या मैदानात मनसेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडीमध्ये यंदा कलाकारांची उपस्थिती नसणार. कलाकारांऐवजी प्रत्येक गोविंदा पथकातील थरामध्ये असणारा एक मुलगा सेलिब्रिटी असणार आहे. त्यामुलाने व्यासपीठावर येऊन आपली कला सादर करायची आहे. यामध्ये जो गोविंदा उत्तम सादरीकरण करेल त्याला इलेक्ट्रीक बाईक बक्षिस म्हणून दिली जाणार आहे.
काय म्हणाले अविनाश जाधव
कोणतरी एक बाई आणायची आणि व्यासपीठावर नाचायचं ही पद्धत आम्ही मोडून काढली आहे. जो मुलगा आठ थर लावतो त्याला १५-२० हजार मिळतात, पण बाहेरील कलाकारांना ४-५ लाख रुपये मिळतात. त्यामुळे यंदा सर्व पारितोषिके थेट मुलांनाच मिळतील. व्यासपीठावर धांगडधिंगाणा करणार नाही. आमचा सेलिब्रिटी आमचा गोविंदा असेल असे अविनाश जाधव यांनी सांगितले.