कल्याण : कल्याण, डोंबिवली, बदलापूरकडून शिळफाटा चौकातून (कल्याण फाटा) महापे दिशेने धावणारी वाहने एमआयडीसीच्या जलवाहिन्या असलेल्या गणेश मंदिर पायथ्या खालील खिंडीतील रस्त्यावरून धावतात. आपण आमदार होतो. तेव्हा हा रस्ता आपण एमआयडीसीकडून उभे राहून सुस्थितीत करून घेतला होता. आता विकासाचे गोडवे गाणाऱ्यांच्या काळात या रस्त्यावर चंद्रावरचे खड्डे पडले आहेत की काय, असा भास होतो, अशी बोचरी टीका मनसेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी समाज माध्यमातून केली आहे.
कल्याण, बदलापूर, डोंबिवली आणि परिसरातील सर्व हलकी वाहने शिळफाटा रस्त्यावरील कल्याण फाटा चौकातून टेकडीतील खिंडीतील रस्त्यावरून महापे दिशेने एमआयडीसीच्या जलवाहिन्या असलेल्या रस्त्यावरून धावतात. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला जलवाहिन्या आहेत. या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकाला कसरत करावी लागते. शिळफाटा रस्त्याकडून नवी मुंबईकडे जाणारा मधला रस्ता म्हणूुन हलकी वाहने भराभर या रस्त्याने धावत असतात. एमआयडीसीच्या नियंत्रणाखाली हा रस्ता आहे. एमआयडीसीने या रस्त्यावरचे खड्डे बुजविणे, हा रस्ता सुस्थितीत ठेवणे ही कामे एमआयडीसीची आहेत. आपण आमदार झालो त्यावेळी पहिले काम हा खिंडीतील रस्ता सुस्थितीत करून घेतला. त्यामुळे कल्याण फाटा चौकात होणारी कोंडी कमी झाली, असे पाटील यांनी म्हटले आहे.
आता त्याच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना या महत्वपूर्ण रस्त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. या खड्ड्यांमुळे अनेक वाहन चालक मुंब्रा वळण रस्त्याने मग महापे दिशेने वाहने घेऊन चालवितात. हा रस्ता टेकडीवरून आहे. या रस्त्यावर एका खड्ड्यात एक म्हैस बसेल एवढ्या आकाराचे हे खड्डे आहेत. या खड्ड्यात आपटून एखादे वाहन पंक्चर झाले. ते लगतच्या जलवाहिन्यांना धडकले तर किती मोठा प्रसंग उद्भवू शकतो. याचे भान एमआयडीसी अधिकाऱ्यांनी ठेवावे. या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देण्यास आता विकासाच्या गप्पा मारणाऱ्या कोणालाच वेळ नाही. कारण त्यांना आता पडलय आपलीच सरंजामी वाचवायची कशी. अशा परिस्थितीत त्यांचे सुभेदार सकाळपासून आपल्या मतदारसंघात फिरत असतात, पण त्यांना प्रवाशांना त्रासदायक ठरणारा, एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना धोका निर्माण करणारा खराब रस्ता दिसत नाही का, असे प्रश्न माजी आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडीचे नष्टचर्य संपविण्यासाठी आताच विकास पुरूषांनी पुढाकार घ्यावा. महापालिका निवडणुका लागल्या की त्याच्या दोन महिने कल्याण, डोंबिवली, ग्रामीण भागात विकास कामांचा महापूर येईल, विकासाचा मोठा धबधबा वाहण्यास सुरूवात होईल, त्या गोष्टीला काही अर्थ नसतो. हे आता लोकांच्या शहराच्या विविध भागात सुरू असलेल्या रस्ते आणि इतर कामांवरून निदर्शनास आले आहे, असे पाटील यांनी सांगितले. जरा महापेकडे जाणाऱ्या कल्याण फाटा चौकातील टेकडीवरील रस्ता सुस्थितीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी या भागाकडे आमचे लक्ष आहे, हे दाखवून द्यावे, असा चिमटा पाटील यांनी समोरील स्पर्धकांना घेतला आहे.