कल्याण : विकास कामांच्या विषयावरुन नेहमीच कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला लक्ष्य करणाऱ्या कल्याण ग्रामीणचे मनसेचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी भाजप नेते, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांना स्मार्ट सिटी प्रकल्प आणि इतर नागरी समस्यांवरुन खडेबोल सुनावताच, कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्याच बरोबर प्रशासनावर नेहमीच डुक ठेऊन असलेल्या आ. प्रमोद पाटील यांनी ‘आमची केडीएमसी फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो. बरे झाले आपणच घरचा आहेर दिला.’ असे ट्वीट केल्याने खळबळ उडाली आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर रविवार पासून तीन दिवसांच्या कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवस त्यांचा मुक्काम कल्याण, डोंबिवलीत आहे. शहरातील विविध कार्यक्रम, पक्षीय बैठकांना जाताना मंत्री ठाकूर यांना शहरात रस्तोरस्ती पडलेला कचरा, खराब रस्ते, खड्डे यांचे दर्शन घडले. ही शहरांची दुरवस्था पाहून मंत्री ठाकूर अस्वस्थ होते. या सगळ्या बिकट परिस्थितीमुळे शहरातील नागरिकांची काय हाल होत असतील असे प्रश्न मंत्री ठाकूर आपल्या सहकारी मंत्री, भाजप पदाधिकाऱ्यांना करत होते.सोमवारी कल्याण मधील दौऱ्यात दिवसभराच्या पक्षीय बैठका आटोपून मंत्री ठाकूर कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयात शहर नियोजन, स्मार्ट सिटी प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी गेले. सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ. किसन कथोरे, आ. संजय केळकर, माजी आ. नरेंद्र पवार उपस्थित होते.

हेही वाचा : ठाण्यात साथीच्या आजारांचा फैलाव सुरूच

स्मार्ट सिटी कार्यालयात गेल्यानंतर आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता सपना कोळी, स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी मंत्री ठाकूर यांना येत्या काळात शहरात राबविण्यात येत असलेले स्मार्ट सिटी प्रकल्प, विकास प्रकल्पांची माहिती देण्यास सुरुवात केली. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे ‘सजविलेले’ कार्पाेरेट सादरीकरण पाहत असताना मंत्री ठाकूर यांनी या प्रकल्पातील किती प्रकल्प पूर्ण झाले. त्याचा किती लोक लाभ घेतात. कल्याण, डोंबिवली शहरांची दोन दिवस जी अवस्था बघतो त्यावरुन ही शहरे स्मार्ट सिटी यादीत आहेत हे ऐकून आश्चर्य वाटते. स्मार्ट सिटी म्हणजे काय? स्मार्ट सिटीत असलेली शहरे किती रस्ते, विकास प्रकल्प राबवून आखीव रेखीव करण्यात आली आहेत. यामधील एक तरी प्रकल्प तुम्ही पूर्ण केला आहे का? असे प्रश्न आयुक्त डाॅ. दांगडे यांना केले.

हेही वाचा : कल्याण डोंबिवलीतील बकालपणा पाहून केंद्रीय मंत्र्यांचे आयुक्तांना खडेबोल

आयुक्त दांगडे यांनी शहर अभियंता कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली बहुतांशी प्रकल्प सुरू आहेत, असे बोलताच एका महिला अधिकाऱ्यावर आपण किती कामाचा बोजा टाकणार आहात, असा प्रश्न केला. येथल्या अधिकाऱ्यांची काम करण्याची इच्छा दिसत नाही म्हणून विदारक चित्र दिसते, अशी टीपणी मंत्री ठाकूर यांनी केली. आयुक्त डाॅ. दांगडे यांच्या प्रशासकीय प्रवासाची माहिती मंत्री ठाकूर यांनी घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खडेबोल कार्यक्रमाच्या वेळी नेहमी आयुक्तांच्या पाठीशी नेहमी मिरविणारे पालिका अधिकारी गायब झाले होते. पालिका अधिकारी, मंत्री, सुरक्षा रक्षक, शिपाई यांच्या समोर ‘हा’ जाहीर कार्यक्रम मंत्र्यांनी केल्याने त्याची सर्वदूर चर्चा सुरू आहे. १९ वर्ष कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केले काय असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. हाच धागा पकडून आ. पाटील यांनी ‘बर झाले भाजप मंत्री ठाकूर यांनीच घरचा आहेर प्रशासनाला दिला आहे,’ असे द्वीट मध्ये म्हटले आहे.