ठाणे : ठाण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. वारंवार काढण्यात येणारे आणि लगेच रद्द होणारे जीआर (शासन निर्णय) यामुळे ठाणेकरांची अधिकच कोंडी होत आहे. यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासन आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यात शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी अलीकडेच आलेल्या तीन जीआरचा निषेध नोंदवला. परिषदेत जाधव म्हणाले, हा ठाण्यातील तिसरा जीआर आहे. पहिले दोन्ही जीआर रद्द झाले. सुरुवातीला परिवहन मंत्र्यांच्या आदेशाने ३१ डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली, त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री बैठक घेऊन तो आदेश रद्द केला. यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली पण पालघर, वसई- विरारपर्यंत कोंडी वाढली. या निर्णयांमुळे होणाऱ्या गोंधळात एका २ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला.
तसेच नवीन जीआरनुसार सकाळी ५ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ११ या वेळेत अवजड वाहनांना ठाण्यात प्रवेशबंदी असेल. मात्र, जाधव यांनी यावर आक्षेप घेतला. शाळा सुटण्याच्या वेळी पुन्हा कोंडी निर्माण होईल आणि मुलांना यात अडकावे लागेल. जीआर काढताना कुठलाही विचार केला जात नाही, अशी टीका त्यांनी केली. जाधव यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन न केल्यास आणि बंदीच्या वेळेत ट्रक दिसल्यास मनसे रस्त्यावर उतरून ट्रक फोडेल असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पायाभूत सुविधा अपुरेपणाचा देखील आरोप केला. ते म्हणाले, मनोहरवाडा रस्ता, वसई-भिवंडी मार्ग आणि घोडबंदर रस्ते वेळेवर सुधारले नसल्यामुळे समस्या वाढू लागल्या आहेत.
ते पुढे म्हणाले, मोठे कॉम्प्लेक्स आणि संस्था, नागरिक यांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र यावे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरत राहील. त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांचा घोडबंदर दौरा रद्द झाल्याचा संदर्भ देत त्यांनी टोला लगावला, प्रोटोकॉलमुळे मंत्र्यांना खऱ्या वाहतूक कोंडीचा अनुभव येत नाही. एक दिवस त्यांनी स्वतःची गाडी चालवावी, मग ठाणेकर किती त्रस्त आहेत ते लक्षात येईल.