कल्याण : कल्याण पूर्वेतील दुर्गामाता मंदिर चौक परिसरात एका हाॅटेल चालकाने मराठी माणसांबद्दल बोलताना त्यांना बेदम मारहाण करू, त्याच बरोबर काही अपशब्द वापरले होते. ही दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांमध्ये प्रसारित होताच, मनसैनिकांनी संघटितपणे जाऊन त्या हाॅटेल चालकाला जाब विचारून त्याला चोप दिला. पुन्हा असा काही प्रकार केला तर मनसे पध्दतीने धडा शिकवण्याचा इशारा दिला.
मनसे सैनिकांचा आक्रमकपणा पाहून हाॅटेल चालकाने मराठी माणसाबद्दल पुन्हा असे काही वक्तव्य करणार नाही असे जाहीरपणे सांगून घडल्या प्रकाराबद्दल पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मराठी माणसाविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. कल्याण, डोंबिवलीत गेल्या वर्षभरात मराठी, अमराठी वादाचे सुमारे पाच ते सहा प्रसंग घडले आहेत. काही प्रकरणे तर न्यायालयापर्यंत पोहचली आहेत.
महाराष्ट्रात राहता तर मग मराठी आलेच पाहिजे, असे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वक्तव्यापासून मनसैनिक मराठीच्या विषयावर अधिक आक्रमक झाले आहेत. कल्याण पूर्व भागात दुर्गामाता मंदिर भागात एक इडली डोसा विक्रीचे हाॅटेल आहे. या हाॅटेलच्या चालकाची मराठी माणसाला बद्दल अपशब्द वापरणारी दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांत प्रसारित झाली होती. या दृश्यध्वनी चित्रफितीमध्ये हाॅटेल मालक मराठी माणसाला लाल होईपर्यंत मारू, अशी भाषा करत होता. ही दृश्यध्वनी चित्रफित मनसेचे कल्याण पूर्वेतील पदाधिकारी कुश राजपूत यांना पाहण्यास मिळाली. त्यांनी कल्याण पूर्वेतील संबंधित हाॅटेलचे ठिकाण आणि त्याचा ठावठिकाणा शोधला.
राजपूत यांनी आपल्या मनसे सैनिकांनी त्या हाॅटेलच्या ठिकाणी जाऊन त्या हाॅटेल चालकाला ‘तु मराठी माणसा बद्दल असे अपशब्द का वापरले. महाराष्ट्रात राहतोस, येथे पैसे कमावतो. उपजीविका करतो आणि पुन्हा मराठी माणसाला बेदम मारण्याची भाषा तू कशासाठी करतोस. कोणत्या मराठी माणसाने तुला कधी त्रास दिला आहे का,’ असे प्रश्न कुश राजपूत यांनी हाॅटेल चालकाला करून त्यांनी हाॅटेल चालकाला बेदम चोप दिला आणि पुन्हा असे काही वक्तव्य केले तर मनसे पध्दतीने दणका देण्याचा इशारा दिला.
या घटनेची माहिती मिळताच इतर मनसै सैनिक हाॅटेल भागात जमा झाले. हे प्रकरण वाढत आहे हे दिसताच हाॅटेल मालकाने घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही, असे आश्वासन मनसैनिकांना दिले.