बदलापूर: नोव्हेंबरमध्ये गेल्या १० वर्षात बदलापूर शहरातील सर्वात कमी तापमानाची नोंद मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी झाली. सोमवारी सकाळी ७ वाजल्याच्या सुमारास बदलापुरात १०.३ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात घट होत असल्याचे चित्र आहे. याच मालिकेत सोमवारी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. सोमवारी जिल्ह्यातही गारठा जाणवला. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली होती.

गेल्या आठवड्याभरात ठाणे जिल्ह्यात तापमानात मोठी घट नोंदवली गेली. शनिवारी जिल्ह्यातील सरासरी तापमान १५ अंश सेल्सियस इतके होते. तर बदलापुरात सर्वात कमी १२.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. उत्तरेकडून येणारे गार वारे आणि घटलेली आर्द्रता यामुळे किनाऱ्यापासून अंतर्गत असलेल्या भागात तापमानात घट होत असल्याची माहिती खाजगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली होती.

हेही वाचा: उध्दव ठाकरे समर्थकांची कल्याण पूर्वेतील शाखा पालिकेकडून जमीनदोस्त; शिंदे पिता-पुत्रांच्या दबावाने कारवाई झाल्याचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या काही दिवसात ही घट कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवसात तापमानात घट पाहायला मिळाली. सोमवारी २१ नोव्हेंबर रोजी गेल्या दहा वर्षातील नीचांकी तापमानाची नोंद बदलापुरात झाली. १९ नोव्हेंबर २०१२ रोजी ९.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर थेट १० वर्षांनी सोमवार, २१ नोव्हेंबर रोजी १०.३ या नीचांकी तापमानाची नोंद बदलापुरात झाली. त्यामुळे बदलापूरकरांना हुडहुडी भरली होती. पहाटे कामावर जाणारे चाकरमानी, शाळेत जाणारे विद्यार्थी थंडीपासून वाचण्यासाठी स्वेटरचा आधार घेत होते. जिल्ह्यात इतर शहरातही सोमवारी गारठा वाढल्याचे दिसून आले. उल्हासनगर शहरात १२.३, कल्याण शहरात १२.८, डोंबिवलीत १३.४, ठाण्यात १५.४, नवी मुंबईत १६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.