ठाणे : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरसह ग्रामीण भागाला सोमवारी झोडपणारा पाऊस ठाणे शहरात तुरळक बरसला. शहरात अवघ्या १७ मीमी इतक्या पावसाची नोंद झाली. असे असतानाही घोडबंदर भागात मात्र, चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या भागात शासनाकडून निर्माण कामे सुरू आहेत. त्यामुळे बांधकामासाठी निघणारी माती अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर पसरली. घोडबंदर भागात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. पादचारी आणि वाहन चालकांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. ठाण्यात पाऊस वाढल्यास घोडबंदरच्या स्थिती विषयी नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.
घोडबंदर मार्गावर गेल्याकाही वर्षांत नागरिकरण वाढले असून नव्याने गृहसंकुले देखील उभी राहिले. त्यामुळे भविष्यात घोडबंदर भागावरील नागरिकरणाचा भार आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. या भागात सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार आणि कासारवडवली ते गायमुख या ‘चार अ’ मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. येथील खोदकामांमुळे सेवा रस्ते तसेच मुख्य मार्गिकेच्या दुभाजकांवर ठिकठिकाणी मार्गावरोधक उभारले गेले. त्याचा परिणाम, मुख्य मार्गिका अरुंद झाल्या आणि सेवा रस्त्यांची अवस्था वाईट झाली.
अरुंद मार्गिकांमुळे घोडबंदरवर धोकादायकरित्या प्रवास करावा लागतो. त्यातच आता सेवा रस्यांचे मुख्य रस्त्यात सामावेश करण्याचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा वाढू लागला आहे. सेवा रस्ते तसेच मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी मातीचे थर उभारण्यात आले असून सोमवारी तुरळक पावसामुळे मातीचे चिखल झाले. हा चिखल कावेसर, पातलीपाडा, कासारवडवली अशा ठिकठिकाणी मुख्य मार्गिकेवर दिसू लागला आहे.
घोडबंदर भागातील सेवा रस्ते आणि पदपथ जवळपास गायब झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरूनच चालावे लागते. त्यात चिखल झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच वाहन चालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर चिखल झाल्याने वाहतुकीचा वेगही मंद करावा लागत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
ठाण्यात सोमवारी पावसाचे वातावरण होते. पंरतु फार पाऊस झाला नाही. त्यानंतरही ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर चिखल पसरला. पाऊस अधिक झाल्यास घोडबंदर भागात काही स्थिती होईल याचा विचार करू शकत नाही. – मारूती सुर्यतळे, रहिवासी, घोडबंदर.
याबाबत ‘एमएमआरडीए’ विभागाकडून प्रतिक्रिया मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.