कल्याण – ठाणे ते कर्जत, कसाराकडील लोकल फेऱ्या वाढवा. या रेल्वे मार्गावर ठाण्यापासून शटल सेवा सुरू करा. कोपर ते मुंब्रा भागातील वाढत्या रेल्वे प्रवासी अपघातांची गंभीर दखल घेण्यात यावी. गर्दीच्या वेळेत महिलांसाठी विशेष लोकल सोडण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रेल्वे प्रवाशांच्या सहकार्याने सफेद गणवेश घालून, काळ्या फिती लावून रेल्वे प्रवास केला. कसारा ते डोंबिवली परिसरातील सुमारे २० हजारांहून अधिक प्रवाशांनी काळ्या फिती लावून रेल्वे प्रवास केला.
रेल्वे अधिकारी प्रवाशांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने त्यांच्या या मागण्यांकडे एकत्रितपणे लक्ष जावे, या उद्देशातून सर्व रेल्वे प्रवाशांनी गुरुवारी सफदे गणवेश घालून, काळ्या फिती लावून प्रवास करण्याचे आवाहन कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटना, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने केले होते. रेल्वे सुरक्षा जवान, लोहमार्ग पोलीस यांच्या सहकार्याने रेल्वे प्रवासी संघटनांनी हे आंदोलन राबविले. प्रवाशांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे, उपाध्यक्ष अनिकेत घमंडी, कौस्तुभ देशपांडे, शशांक खेर, तन्मय नवरे, रेखा देढिया, सागर घोणे हे पदाधिकारी सफेद गणवेश परिधान करून डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांना काळ्या फिती लावण्याचे काम करत होते. डोंबिवली रेल्वे स्थानकातून सुमारे १० हजारांहून अधिक प्रवाशांनी काळ्या फिती लावून प्रवास केला.
आसनगाव रेल्वे स्थानकात महासंघाचे सरचिटणीस जितेंद्र विशे, कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शैलेश राऊत, महेश तारमळे, मीना फर्डे, ज्ञानेश्वर चंदे, अजय गावकर, प्रफुल्ल शेवाळे या अभियानात सहभागी झाले होते. कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील सुमारे १२ हजारांहून अधिक प्रवाशांनी काळ्या फिती लावून मध्य रेल्वे मार्गावरील प्रवास करून आपल्या मागण्यांकडे रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
ठाणे ते कर्जत, कसारा शटल सेवा सुरू करा. कल्याण ते कसारा तिसरी, चौथ्या मार्गिकेचे काम लवकर पूर्ण करा. सकाळच्या वेळेत मेल, एक्सप्रेस ऐवजी लोकल सेवेला प्राधान्य असावे. अनेक रेल्वे स्थानकात सरकते जिने नाहीत. ज्या ठिकाणी आहेत ते बंद आहेत. सरकते जिने नियमित सुरू राहतील याची काळजी घेण्यात यावी, अशा प्रवाशांच्या मागण्या आहेत.
ठाणे ते कर्जत, कसारा रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या अनेक समस्या आहेत. या भागातील लोकलची संख्या वाढविणे, ठाणे ते कसारा, कर्जत शटल सेवेची प्रवाशांची मागणी आहे. कोपर ते मुंब्रा भागात वाढते अपघात होत आहेत. अशा अनेक महत्वाच्या विषयावर रेल्वे अधिकारी नियमित भेटीगाठी घेऊनही लक्ष देत नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सहभागातून सनदशीर मार्गाने आजचे काळ्या फिती लावून, सफेद गणवेश परिधान करून आंदोलन केले जात आहे. आता तरी रेल्वे अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ.