बदलापूर: सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो आहे. गणपती बाप्पा मोरया अशी घोषणा सर्वच गणेशभक्त देत असतात. मात्र यातील मोरया साधू आणि मुरबाडचा थेट संबंध होता. त्याचे पुरावे एका पुस्तकाच्या निमित्ताने प्रकाशझोतात आले आहेत. यात मोरया पीठाचे साधू यांना त्यावेळी सनद दिली जात होती. धर्म कार्य म्हणून इनाम स्वरूपात दररोज एक चांदीने नाणे देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे धार्मिक आणि जनसेवा संदर्भाच्या दृष्टीने हा पुरावा महत्त्वाचा मानला जातो आहे.
विविध काळातील पुरावे, सनद, पत्रे यातून त्या त्या काळातला इतिहास समजून घेता येतो. व्यक्तिमत्त्व गौरव, कार्यगौरव, राष्ट्रगौरव कार्याची पोचपावती या दृष्टीनेही काही पत्रे, सनद दिली जात असत. म्हणून या सनदपत्रांना खूप महत्व आहे. त्यातील आदेश, सूचना आणि त्यांची अंमलबजावणी त्यानुसार केली जात होती. वंशपरंपरागत किंवा काही ठराविक कालखंड अशा दोन्ही प्रकारे त्याची अंमलबजावणी होत असे. यात सनद म्हणजे शाही आदेश किंवा अधिकारी फरमान ह्याअर्थाने होत होता.
शिवपूर्वकाळखंड तसेच शिवकाळखंडापासून ते ब्रिटिश राजवटीपर्यंत सनदा, इनामे, नियुक्तीपत्रे वाटप करण्यात येत होती. त्यातून तत्कालिन समाज परिस्थिती राजवटी, अधिकारी व्यक्ती यांची कार्यप्रणाली गावांची नावे, याबाबतीत माहिती मिळते. याच दस्तऐवजांचा अभ्यास करून पेशाने शिक्षक असलेले मुरबाडमधील संशोधक आणि लेखक योगेंद्र बांगर यांनी मुरबाड संदर्भ आणि इतिहास हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात मुरबाड आणि मुरबाडशी संबंधित इतिहासाची मांडणी केली आहे.
पुराव्याच्या आधारे विविध कालखंडातील परिस्थिती, त्यावेळच्या महत्वाच्या घटना, वास्तू, व्यवहार यांची नोंद या पुस्तकात देण्यात आली आहे. याच पुस्तकातील एका संदर्भावरून मुरबाड आणि मोरया गोसावी यांचा थेट संबंध प्रकाशात आला आहे. योगेंद्र बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवचरित्र साहित्य खंड-३ लेखांक-५१० पत्र क्रमांक १९६ दि. २४ मे १६३२ ते २३ मे १६३३ या पत्रामध्ये त्यावेळचे इस्लामाबाद (भिवंडी) मामला कसबे मुरबाड, देवाचे (देऊपे) या गावांची अत्यंत महत्वपूर्ण नोंद दिसून येते.
इ.स. १६३२ साली मुरबाड गावाचा कसबे हा असंत महत्वपूर्ण उल्लेख दिसून येतो. कसबे म्हणजे कारागिरी करणारे, कसब असणारे लोक ज्या गावात राहतात असे गाव होय. हे पत्र श्रीमंत महासाधु चिंचवडचे सुप्रसिध्द मोरया गोसावी यांना दिले आहे. त्यांचा वावर, संपर्क, सत्संग मुरबाड गाव आणि परिसरात होता, असे या पुराव्यावरून दिसून आले आहे असे योगेंद्र बांगर यांनी सांगितले आहे. श्री महासाधू मोरया गोसावी हे चिंचवड जिल्हा पुणे येथील पिठाचे मुळपुरुष होते. त्यांचा जन्म शके १२९७ माघी चतुर्थीला इ. स. १३७६ रोजी झाला. त्यांच्या चरित्रामध्ये त्यांना १८६ वर्षे इतके दीर्घायुष्य लाभले, असेही बांगर यांनी सांगितले. त्यांचा मृत्यू इ. स. १५६१ म्हणजेच शके १४८३ रोजी झाला. श्री मोरया गोसावी शिवपूर्वकाळात होऊन गेले असले तरी त्यांच्या पीठावर उत्तराधिकारी असणाऱ्या पुढील सर्व पिठाधिश व्यक्तिचा उल्लेख मोरोया मोरोबा, मोरया, श्रीदेव असा होत असल्याचे दिसून येते, असेही बांगर यांनी सांगितले.
निजामशाही काळात मुरबाड व देवपे या गावांचा उल्लेख २४ मे १६३२ पासून २४मे १६५४ पर्यंत मोरया गोसावी यांना दिलेल्या या पत्रांनुसार दिसून येतो. त्यावेळी मुरबाड तालुका हा इस्लामाबाद उर्फ भिवंडी सुभ्याचा एक प्रशासकीय उपविभाग होता. त्याला ‘कर्यात’ असे संबोधले जात होते. तेथे मलिक सैद हा निजामशाही अधिकारी कार्यरत होता. या सनदापत्रांत मुरबाड हे गाव व्यापारी पेठ असावे व तेथे कर आकारणी होती म्हणूनच मलिकसैद याने श्री. मोरया गोसावी यांना मुरबाड गावाच्या जकातीतून दररोज एक लारी म्हणजे चांदीचे ना देण्याविषयी सुचविले आहे, असे योगेंद्र बांगर यांनी सांगितले आहे. आदिलशाही राज्यात ही नाणी पाडत असत.
इ. स. १६३६ मध्ये मुघलांनी निजामशाही राज्य खालसा केले आणि उत्तर कोकण (निजामशाही कोकण) विजापूरच्या आदिलशहाकडे दिले. तेव्हापासून मुरबाडवरील निजामशाईन रुस्तुमेजमान (खान अलीखान) या आदिलशाही राजवटीतील भिवंडी सुभ्याचा सुभेदारी संपुष्टात आली. या सनदपत्रांमध्ये श्री. मोरया गोसावी यांचे मुरबाडमधील इनाम त्या काळापूर्वीच्या शिरस्त्याप्रमाणे तसेच सुरू ठेवण्याविषयीचे ‘खुर्दखत’ दिले आहे. याचा अर्थ राजवट बदलली तरी ही सदन सुरूच ठेवली होती. यातून मोरया गोसावी आणि त्यांच्या जनसेवेला त्या त्या काळातल्या राजवाटींनीही मानाचे स्थान दिले. तसेच त्यांनी या कार्याला हिंदू म्हणून कोणतीही अडचण येणार नाही अशी काळजी घेण्याचे फर्मानही स्थानिक अधिकाऱ्यांसाठी काढल्याची नोंद आहे.
त्यावेळी मोरया पीठाच्या वारसदारांचे या परिसरात वास्तव्य आणि कार्य होते. त्यांना सनद दिली जात होती. त्याचे पुरावेही आहेत. हा अतिशय वेगळा आणि अर्थपूर्ण उल्लेख आहे. – योगेंद्र बांगर, अभ्यासक, लेखक.