कल्याण – कल्याण शीळ रस्त्यावरील कोकण रत्न हाॅटेलसमोर नऊ वर्षापूर्वी दोन मोटार सायकल स्वारांनी एकमेकांना जोराने धडक दिली होती. या अपघातात दोन्ही मोटार सायकल स्वार जखमी झाले होते. या अपघातामधील एका जखमी दुचाकी स्वाराला ठाण्याच्या मोटार अपघात न्याय प्राधिकरणाचे सदस्य आर. व्ही. मोहिते यांनी एक लाख ९१ हजार रूपयांची भरपाई जाहीर केली.
या अपघातात दोन्ही दुचाकी स्वारांची तेवढीच चुकी आहे. त्याच बरोबर भरपाईसाठी दावा करणाऱ्या दुचाकी स्वाराची यामध्ये ७५ टक्के चूक असल्याने दावेदार २५ टक्के भरपाईसाठी पात्र आहे, असे मत न्यायाधिकरणाने नोंदविले. याप्रकरणाची माहिती अशी, की याप्रकरणातील दावेदार बबन मारूती पाटील (५१) १५ फेब्रुवारी २०१७ रोजी आपल्या दुचाकीवरून सकाळच्या वेळेत शिळफाटा रस्त्यावरील कल्याणफाटा-डोंबिवली रस्त्याने जात होते. बबन यांची दुचाकी शीळ रस्त्यावरील कोकण रत्न हाॅटेलसमोर आल्यावर त्यांची आणि समोरून आलेल्या दुचाकींची जोराची धडक दिली. दोन्ही दुचाकी एकमेकांवर धडकल्या. त्यात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले.
यात दोन्ही स्वार जखमी झाले. बबन पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रूग्णालयात महिनाभर उपचार सुरू होते. सुस्थितीत झाल्यानंतर पाटील यांनी मोटार अपघात वाहन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाईसाठी मोटार अपघात न्याय प्राधिकरणासमोर दावा दाखल केला. या दाव्याप्रमाणे बबन पाटील यांनी १५ लाख रूपये भरपाईची मागणी केली होती. याशिवाय वाहन कायद्याप्रमाणे अतिरिक्त एक लाख रूपयांची मागणी केली होती.
स्थानिक पोलिसांनी या अपघात प्रकरणी दोन्ही दुचाकी स्वारांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला होता. दावा दाखल झाल्यानंतर न्यायधिकारणासमोर सुनावण्या सुरू होत्या. याप्रकरणी दाखल पोलीस प्राथमिक तपासणी अहवालाची माहिती न्यायधिकरणाने घेतली. त्यात दोन्ही दुचाकी स्वारांवर गुन्हा दाखल असल्याचे आढळले.
समोरून आलेल्या दुचाकी स्वाराने आपल्या दुचाकीला जोराची ठोकर दिली. त्यामुळे आपण गंभीर जखमी झालो, असा दावा बबन पाटील यांच्याकडून करण्यात आला होता. भरपाईची मागणी केली होती. विरुध्द बाजुकडील दुचाकी स्वाराने न्यायधिकरणासमोर सांगितले, की दावेदार पाटील हे चुकीच्या मार्गिकेतून आपल्या दिशेने आले. ते वेगात होते. त्यांनी फक्त भोंगा वाजविला असता तर हा अपघात टाळता आला असता. या अपघाताला पाटील ७५ टक्के आणि विरुध्द बाजुचा दुचाकी स्वार २५ टक्के जबाबदार असल्याचे निरीक्षण न्यायाधिकरणाने नोंदवले.
पाटील यांनी आपणास या अपघातामुळे ४६ टक्के अपंगत्व आल्याचे आणि यापुढे आपण काहीच काम करू शकत नसल्याचा दावा न्यायाधिकरणासमोर केला. पाटील यांचा दावा न्यायाधिकरणाने मान्य केला नाही. पाटील यांनी रुग्णालय खर्च आणि इतर खर्च असा एकूण सात लाख ६५ हजार खर्चाचा दावा केला. या अपघाताला बबन पाटील हेही तितकेच जबाबदार असल्याचे मत नोंदवत न्यायालयाने त्यांना झालेल्या खर्चाच्या २५ टक्के म्हणजे एक लाख ९१ हजार ३८० रूपये भरपाई देण्याचे याप्रकरणातील विमा कंपनी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीला आदेश दिले. याप्रकरणात कोणताही सबळ पुरावा दावेदाव दाखल करू शकला नाही.