लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगर: दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि अरुंद रस्त्यांवर येणारा भार लक्षात घेऊन डोंबिवलीजवळील काटई नाका ते अंबरनाथ हा रस्ता काँक्रीटचा करण्याचे ठरवले. त्याचे कामही बहुतांशी पूर्ण झाले. परंतु या रस्त्याच्या दोन काँक्रिट तुकड्यांना जोडण्याचे काम अपूर्ण राहिल्याने रस्त्याचे काँक्रीटीकरण करूनही रस्त्यावर खड्ड्यांचा अनुभव येतो आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत डोंबिवलीपल्याड २७ गावे, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग, खोणी, नेवाळी तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले. परिणामी वाहनांची संख्या वाढून रस्ते अपुरे पडू लागले. काटई अंबरनाथ मार्गही वर्दळीचा बनला. डांबरी असल्याने या रस्त्याची भर पावसात चाळण होत होती. त्यामुळे हा रस्ता काँक्रीटचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला सुरुवात झाली.

आणखी वाचा-ठाणे: मेट्रोच्या कामांमुळे वाहतुक बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच्या घडीला काटई ते खोणी या भागात रत्याचे काँक्रीटीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. यातील धामटन ते हेदुटने भागात काँक्रिट रस्त्यावर दोन पट्ट्यामध्ये काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आलेले नाही. यात पेव्हर ब्लॉक किंवा काँक्रिट लावणे अपेक्षित होते. हे केले नसल्याने येथे मोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यातून वाहने जात असताना आदळतात. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. या भागातून वाहने नेताना काँक्रिट रस्ता असल्याने वाहने वेगाने जातात. परंतु अचानक येणाऱ्या या खड्ड्यांमुळे वाहने आदळतात. याचा वाहनचालकांना फटका बसतो आहे. त्यामुळे काँक्रिट रस्ता असूनही येथून वाहने वेगाने चालवता येत नाहीत. परिणामी येथे वाहतुकीचा वेग मंदावत आहे. परिणामी वाहनचालकांच्या संतापात भर पडत आहे. त्यामुळे काँक्रिट रस्त्याच्या जोड असणारे हे भाग तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.