अंबरनाथ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेची एकही संधी न सोडणारे वन मंत्री गणेश नाईक यांच्यावर आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच टीका केली. वयोमानानुसार ते बोलत राहणार, आपण दुर्लक्ष करायचं अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. शिंदेंना शह देण्यासाठी नाईक सातत्याने शिंदे पिता पुत्रांना लक्ष्य करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रतिक्रियेनंतर आता नाईक काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रीपद मिळालेल्या वन मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात आपले राजकीय वजन वापरून शिंदे सेनेला चेपण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याच पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून शिंदे यांना पुढची पालिका निवडणुकीची वाट सोपी नसेल असा स्पष्ट संदेश दिला होता. तसेच नाईक यांनी सातत्याने जनता दरबारातून शिंदे यांच्या अख्यत्यारीतील विषयांवर कठोर भूमिका घेतली होती. त्यातील नुकतेच दहिसर टोल नाका स्थलांतर विषयावरून नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना तर नवी मुंबईत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांवरून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले होते.
गेल्या काही दिवसांपासून नाईक यांनी ठाणे महापालिका क्षेत्रात आपले जनता दरबारही वाढवले आहेत. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्याच आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत पक्षाचा मेळावा घेत आपणही संघर्षाला तयार आहोत असा स्पष्ट संदेश दिला होता. या मेळाव्याला काही दिवस उलटत नाही तोच नाईक यांनी पुन्हा ठाण्यात जनता दरबार भरवला.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहरात भेट दिली. विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि इतर कामांची पाहणी यावेळी डॉ श्रीकांत शिंदे यांनी केली. यावेळी माध्यमांनी डॉ श्रीकांत शिंदे यांना नाईक यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता त्यांनी नाईक यांना गांभीर्याने घेत नसल्याचे संकेत दिले. काहींच वयोमानानुसार होत असत, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असत. शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की टीकेला कामातून उत्तर द्यायचे. कामामुळेच विधानसभेत एकहाती सत्ता मिळाली आहे. भविष्यातही नवी मुंबईत लोक दाखवून देतील. लोक समजूतदार आहे. कितीही टीका केली तरी लोकांना कळत की कोण प्रसिद्धीसाठी टीका करत आहे की कशासाठी, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.