राज्यभरात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी बंडखोर आमदारांविरुद्ध अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलने केली जात असताना, ठाणे जिल्ह्यात अद्याप असा कोणताही विरोध प्रत्यक्ष रस्त्यावर पाहायला मिळाला नव्हता. मात्र आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर मधील कॅम्प दोन भागात असलेले मध्यवर्ती कार्यालय देखील फोडण्यात आले आहे. आज (शनिवार) दुपारच्या सुमारास चार ते पाच जणांनी या कार्यालयाची तोफफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ३५ पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे. त्यामुळे शिंदें विरुद्ध उद्धव ठाकरे अशी स्थिती सध्या पहायला मिळत आहे. बंडामुळे आता शिवसेनेचे कार्यकर्तेही एकनाथ शिंदेवर नाराज झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सेनेच्या बंडखोर आमदारांचे कार्यालय फोडणे सुरू केले आहे.

आज सकाळी पुण्यात आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्यानंतर, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे जे आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत, त्यांचे उल्हासनगर येथील कार्यालय फोडण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उल्हासनगरमध्ये पहिला उघड विरोध झाल्याने आश्चर्य व्यक्त –

या घटनेनंतर उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर हे एक महत्त्वाचे शहर आहे. डोंबिवलीनंतर उल्हासनगर शहरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय आहे. सिंधीबहुल असलेल्या उल्हासनगर शहरात खासदार शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळाले. तर अडीच वर्षांपूर्वी हातातून निसटलेली पालिकेतील सत्ताही खासदार शिंदे यांच्या माध्यमातून परत मिळाली होती. त्यामुळे शिंदे पिता-पुत्रांनी चमत्कार केल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यात तेही त्यांचे पुत्र खासदार असलेल्या त्यांच्या मतदार संघातील उल्हासनगरमध्ये पहिला उघड विरोध झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. याप्रकरणी घटनास्थळावरून चार ते पाच जणांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे.