ठाणे : राज्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगत प्रवाशांच्या सुविधेसाठी १६ ठिकाणी अत्याधुनिक सेवा सुविधा केंद्रे उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सेवा सुविधांमध्ये स्वच्छतागृह, पेट्रोल पंप, वाहन दुरुस्ती केंद्र, वाहनतळ यासांरख्या महत्त्वाच्या सुविधांचा सामावेश असणार आहे. यापूर्वी महामार्गालगत २२ ठिकाणी स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, खाद्य पदार्थ, इंधन स्थानके उपलब्ध करुन देण्यात आली होती.
नागपूर ते मुंबई प्रवास वेगवान व्हावा यासाठी राज्य सरकारने समृद्धी महामार्ग या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. चार टप्प्यामध्ये हे काम सुरु होते. यातील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी, दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर, तिसरा टप्पा भरवीर ते इगतपूरी आणि उर्वरित शेवटचा टप्पा इगतपूरी ते भिवंडी येथील आमणे असा आहे. पहिल्या टप्प्याचे (५२० किमी) लोकार्पण डिसेंबर २०२२ मध्ये झाले होते. दुसऱ्या टप्प्याचे (८० किमी) लोकार्पण मे २०२३ मध्ये तर तिसऱ्या टप्प्याचे (२५ किमी) लोकार्पण मार्च २०२४ मध्ये झाले होते. तर चौथा आणि महत्त्वाच ७६ किमीचा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. या टप्प्याचे लोकार्पण लवकरच होण्याची शक्यता आहे. चौथा टप्पा सुरु झाल्यास समृद्धी महामार्गावरून थेट मुंबई गाठता येणार आहे. एकूण ७०१ किमी लांबीचा हा प्रकल्प आहे.
समृद्धी महामार्गावर सध्या २२ ठिकाणी स्वच्छतागृहे, पाण्याची सुविधा, खाद्य पदार्थ, इंधन स्थानके उपलब्ध आहेत. लवकरच प्रवाशांसाठी खाद्य पदार्थ स्टाॅल, पेट्रोल पंप, वाहन दुरुस्ती केंद्र, वाहनतळ, स्वच्छतागृह, प्राथमिक उपचाराच्या सेवा सुविधा पुरविण्यासाठी १६ ठिकाणी अत्याधुनिक सोयी-सुविधा केंद्रे उपलब्ध केले जाणार आहेत. या सेवा केंद्रामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.