ठाणे : प्रत्येक गाव समृद्ध झाले तर, राज्यही समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला असून हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर याकालावधी पर्यंत राबविले जाणार आहे. या अभियानात सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवर त्या त्या ग्रामपंचायतीला गुण दिले जाणार आहेत. या घटकांशी निगडित विविध उपक्रम तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी कल्याण तालुक्यातील खोणी येथे आयोजित करण्यात आला आहे. या अभियाना संदर्भातील माहिती देण्यासाठी मंगळवारी, आज ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभियानातील उपक्रमांची माहिती दिली. या अभियानासाठी तालुका स्तरावरील पंचायत समितीच्या सर्व विभागातील विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, कृषी अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य पर्यवेक्षक आणि अन्य क्षेत्रिय अधिकाऱ्यांची प्रत्येक गावासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, जिल्हा स्तरावरुन तालुका नोडल अधिकारी म्हणून जिल्हास्तरीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अभियान विशेष काही घटकांवर राबविले जाणार असून त्या घटकांची योगरित्या अंमलबजावणी केल्यास गुण दिले जाणार असून त्यावर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला पुरस्कार दिले जाणार आहेत.

या अभियानाचे हे आहेत मुख्य घटक

  • सुशासन युक्त पंचायत तयार करणे.
  • सक्षम पंचायत करणे.
  • जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे.
  • मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे.
  • गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे.
  • उपजिवीका विकास, सामाजिक न्याय
  • लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे.
  • नाविन्यपूर्ण उपक्रम

हे आहेत अभियानाची वैशिष्ट्ये

विकसित महाराष्ट्र २०४७ करिता पंचायत राज संस्था अधिक गतीमान करणे

ग्रामपंचायतीमध्ये विकासाची निकोप स्पर्धा

विकासाला लोक चळवळीचे स्वरुप देणे

अभियान कालावधीत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

पुरस्काराची एकूण रक्कम रुपये २४५.२० कोटी रुपये

ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना विविध स्तरावर एकूण १,९०२ पुरस्कार दिले जाणार