ठाणे : एखादे हाॅटेल, रेस्टाॅरंटच्या सेवे विषयी गुगलवर चांगले रिव्ह्यू आणि काॅमेंट दिल्यास त्याबदल्यात पैसे देतो असे सांगून नागरिकांकडूनच पैसे उकळणाऱ्या एका टोळीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील कुर्ला भागात ही टोळी एका घरामधून हे फसवणूकीचे रॅकेट चालवित होती. त्यांच्या मुख्य साथिदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडे सात मोबाईल, ३७ एटीएम कार्ड, ३६ धनादेश पुस्तिका, तीन लॅपटॉप, तीन बँक खात्यांच्या पुस्तिका, १६ सिम कार्ड तसेच इतर साहित्य आढळून आल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

मुंब्रा येथे राहणारी तरुणी अर्धवेळ कामाच्या शोधात होती. त्यावेळी तिला टेलेग्राम या समाजमाध्यमावर एक संदेश प्राप्त झाला. गुगलवर विविध हाॅटेल, रेस्टाॅरंटवर रिव्ह्यू आणि काॅमेंट देण्याचे टास्क असून रिव्ह्यू, काॅमेंटच्या बदल्यात चांगले पैसे मिळणार असल्याचे लिहीले होते. संबंधित तरुणीने या कामास होकार दर्शविले. परंतु या कामासाठी तिच्याकडूनच विविध शुल्काच्या माध्यमातून ४० हजार रुपये उकळण्यात आले होते. याप्रकरणी तरुणीने १० फेब्रुवारीला मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे कलम ३१९ (२), ३१८ (४) भारतीय न्याय संहितेसह कलम ६६ क, ड आयटी कलमासह गुन्हा नोंद करण्यात आला होता.

याप्रकरणाचा तपास मुंब्रा पोलीस ठाण्यातील सायबर कक्षाकडून सुरू होता. पथकाने हे टेलेग्राम वापरकर्ता कोण आहे याची माहिती प्राप्त केली. तसेच गुन्ह्यात बँक खात्यासाठी वापलेल्या खात्यांची माहिती देखील काढली. त्यानंतर विविध तांत्रिक माहिती गोळा केली. दरम्यान, या प्रकरणातील चारजण कुर्ला भागात राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना चारजण त्याठिकाणी आढळून आले. त्यांच्याकडे सात मोबाईल, ३७ एटीएम कार्ड, ३६ धनादेश पुस्तिका, तीन लॅपटॉप, तीन बँक खात्यांच्या पुस्तिका, १६ सिम कार्ड तसेच इतर साहित्य आढळून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. याप्रकरणात पोलिसांनी चारही जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात मोठी टोळी सहभागी असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्या दिशेने आता तपास सुरू केला आहे. मागील काही महिन्यांपासून टास्क देण्याच्या नावाखाली अनेक नागरिकांची फसवणूक झाली आहे. यामध्ये उच्च शिक्षितांचाही सामावेश आहे.