ठाणे : बेकायदेशीर पद्धतीने दोन देशी बनावटीच्या पिस्टल आणि जिवंत काडतुसांसह कळव्यातून मुंब्र्याला निघालेल्या जाबीर इलियास सिद्धीकी (३६) या तरुणाला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ५२ हजार रुपये किंमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
साकेत रोडहून कळवा ब्रिज मार्गे एक जण देशी पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन मुंब्र्याच्या दिशेने जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली. ही माहिती मिळताच, पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सापळा रचत सिद्धीकी याला ताब्यात घेतले. यावेळी सिद्धिकी याची झडती घेतली असता, त्याच्याकडे प्रत्येकी २५ हजारांचे दोन बनावट देशी पिस्टल आणि प्रत्येकी एक हजारांचे दोन जिवंत काडतुसे असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायदा कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.