कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका
अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वरकरणी प्रस्थापित आणि नवख्या उमेदवारांनी नगरसेवक म्हणून स्थानिक प्रशासन व्यवस्थेत स्थान राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याचे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात खरी परीक्षा या भागातून निवडून आलेल्या आमदारांची आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपवासी झालेले बदलापूरचे किसन कथोरे, ‘नमो’ लाटेतही निसटत्या मतांनी का होईना पण सेनेची अंबरनाथची जागा राखणारे डॉ. बालाजी किणीकर आणि सध्या अंबरनाथ निवडणुकीत भाजपची जबाबदारी सोपविण्यात आलेले कल्याणचे नरेंद्र पवार यांच्या नेतृत्त्व गुणांचा या पालिकेच्या निवडणुकीत कस लागणार आहे. पालिकेच्या निवडणुकीत पक्षाला एकहाती घवघवीत यश मिळवून दिले तर या आमदारांचे पक्षामधील वजन वाढणार असून त्यामुळे मंत्रिपदावरील त्यांचा दावा अधिक बळकट होणार आहे.
गेल्या मे महिन्यात केंद्रातील निवडणुकीतील ‘नमो’ लाट दिवाळीत झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली. त्यामुळे शिवसेनेशी काडीमोड घेऊनही भाजपला राज्यात घवघवीत यश मिळाले. ठाणे जिल्ह्य़ात शिवसेनेपेक्षा भाजपने सरस कामगिरी केली. त्यामुळे जिल्ह्य़ातील एका तरी आमदाराला लाल दिवा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपवाद वगळता इतर कुणालाही मंत्रिपदे मिळाली नाहीत. त्यामुळे जिल्हा भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी आहे.
विधानसभा निवडणुकीतील यश हा ‘नमो’ लाटेचा प्रताप होता. त्यामुळे त्यात मिळालेल्या यशावर आमदारांच्या कर्तृत्वाचे मोजमाप न करता पालिका निवडणुकांमध्ये त्यांची पुन्हा ‘परीक्षा’ घेऊन मगच त्यांच्यावर अधिक जबाबदारी टाकण्याचे भाजप नेतृत्वाने ठरविले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्याच अनुषंगाने बदलापूर पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी स्थानिक आमदार किसन कथोरे, तर अंबरनाथची जबाबदारी कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

लांडगे, चौधरीही बढतीच्या प्रतीक्षेत
आमदारांप्रमाणेच शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे तसेच अंबरनाथचे मावळते नगराध्यक्ष सुनील चौधरीही एखाद्या महामंडळात अथवा विधान परिषदेत वर्णी लागावी, अशी अपेक्षा बाळगून आहेत. अल्पमतात असलेली अंबरनाथची सत्ता इतर पक्षांच्या मदतीने पाच वर्षे कायम राखण्यात सुनील चौधरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आता नगराध्यक्षपद भूषविल्यानंतर पुन्हा पालिकेच्या राजकारणात जाण्यात त्यांना रस नाही. विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्वमधून गोपाळ लांडगे पराभूत झाले असले तरी कल्याण लोकसभा क्षेत्रात त्यांनी पक्षासाठी दिलेले योगदान दुर्लक्ष करण्याजोगे नाही. त्यामुळे आमदारांप्रमाणेच हे दोघेही निवडणुकीच्या कामगिरीवर बढती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

अंबरनाथमध्ये बिनविरोध निवडीचा विक्रम
अंबरनाथ : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अंबरनाथ शहरात एकूण पाच प्रभागांमध्ये निवडणुका बिनविरोध झाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिनविरोध निवडीचा हा विक्रम असून त्यातील चार जागा शिवसेनेने तर एक जागा काँग्रेसने पटकावली आहे. अंबरनाथ शहरात एकूण ५७ प्रभाग आहेत. त्यातील पाच प्रभागांमध्ये आता निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. २२ एप्रिल रोजी ५२ प्रभागात निवडणुका होतील. प्रभाग क्र. ९ मधून (खामकर आळी परिसर) शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचे पुत्र निखील वाळेकर यांची तर प्रभाग क्र. १४ मधून (बालाजीनगर) त्यांच्या पत्नी मनीषा वाळेकर बिनविरोध निवड झाली आहे. मनीषा वाळेकर यांची तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवड झाली आहे. अंबरनाथच्या पालिकेत प्रथमच आई आणि मुलगा निवडून गेले आहेत. प्रभाग क्र. १३ खुंटवली गावठाण-मेटननगर येथून शिवसेनेचे उत्तम अहिवळे विनबिरोध निवडले गेले आहेत. त्याचप्रमाणे कोहोज गावातून (प्रभाग क्र. १६) काँग्रेसचे उमेश पाटील प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घेतल्याने बिनविरोध निवडले गेले आहेत. पाले गावातून (प्रभाग क्र. ५६) शिवसेनेच्या योगिता नितीन वारिंगे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. दिवंगत नगरसेवक नितीन वारिंगे यांच्या त्या पत्नी आहेत.

भाजप उमेदवारावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
ठाणे : बदलापुरातील प्रभाग क्र. १४ मधून निवडणूक लढविणारे भाजपचे अधिकृत उमेदवार किरण भोईर व त्यांचे पिता काँग्रेस नेते शंकर भोईर यांच्यासह ५० जणांवर परवानगी न घेता प्रचार रॅली काढल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री ८ वाजता बदलापूर एसटी डेपोसमोरील रस्त्यावर भोईर यांनी प्रचारार्थ रॅली काढली होती, परंतु या रॅलीसाठी पोलीस परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे हा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.