कल्याण – मुरबाड तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्याच्या पायथ्याखाली बलिवरे गाव ते भीमाशंकर डोंगर माथा रोप वेची उभारणी केली तर तीन तासांमध्ये भाविक भीमाशंकर येथे पोहचतील. ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी भाविक, पर्यटक, गिर्यारोहक भीमाशंकरला जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग करतात. त्यामुळे बलिवरे ते भीमाशंकर मार्गावर रोप वेची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी ठाणे जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल तोंडलीकर यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका, मुरबाड परिसरातील ७५ गावांमधील रहिवासी, भिवंडी, ठाणे, मुंबई भागातील भाविक, गिर्यारोहक, पर्यटक मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे येऊन तेथून बलिवरे गावातून ते भीमाशंकर अभयारण्यातून पायवाटेने तीन तासांत डोंगर माथ्यावरील भीमाशंकर तीर्थक्षेत्री पोहचतात. हाच प्रवास वाहनाने करायचा असेल तर मुरबाडमार्गे माळशेज घाट, घोडेगाव मार्गे भीमाशंकर येथे वळसा घाऊन जावे लागते. या प्रवासासाठी प्रति व्यक्ती ५०० ते ६०० रुपये खर्च येतो. हा खर्च टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक भाविक भीमाशंकर येथे जाण्यासाठी बलिवरे गावातील रस्त्याला पसंती देतात, असे अध्यक्षा तोंडलीकर यांनी मंत्री मुनगंटीवर यांच्या निदर्शनास आणले.

हेही वाचा – डोंबिवली पूर्वेत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी, मानपाडा रस्ता अडवून फेरीवाल्यांचा व्यवसाय

महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, श्रावणी सोमवारी भीमाशंकर येथे भाविकांचा जनसागर लोटतो. याशिवाय वर्षभर अनेक नागरिक भीमाशंकर येथे दर्शनासाठी, पर्यटन, गिर्यारोहणासाठी येतात. या नागरिकांचा विचार करून मुरबाड तालुक्यातील बलिवरे ते भीमाशंकर डोंगरमाथा रोप वेची बांधणी केली तर बलिवरे भागातून भीमाशंकरला जाणाऱ्या भाविक, पर्यटकांची गर्दी वाढले. या भागात वाहनांची वर्दळ वाढेल. त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी तयार होतील. स्थानिकांना स्थानिक पातळीवर व्यवसाय करणे शक्य होईल. या भविष्यवेधी वातावरणाचा विचार करून बलिवरे ते भीमाशंकर रोप वेची उभारणी करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी अध्यक्षा तोंडलीकर यांनी केली आहे.

हेही वाचा – “राजन विचारे यांच्या सुरक्षेत कशाच्या आधारे कपात?” सुरक्षा कपातीबाबतचा अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

“भीमशंकरला जाण्यासाठी बहुतांशी भाविक मुरबाड तालुक्यातील बलिवरे गावाजवळील पायवाटेला पसंती देतात. या ठिकाणी शासनाने चांगले रस्ते, बसची वारंवारिता उपलब्ध करून द्यावी. या ठिकाणी रोप वेची उभारणी झाली तर ठाणे, मुंबई, नाशिक भागातील भाविक या भागातून भीमाशंकर येथे जातील. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल. शासनाने या मागणीचा प्राधान्याने विचार करावा.” असे सासणे मुरबाड येथील ग्रामस्थ अशोक खरे म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murbad bhimashankar rope way demand to culture minister sudhir mungantiwar ssb
First published on: 31-01-2023 at 14:20 IST