कल्याण – ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सरळगाव, संगम परिसरात गेल्या तीन दिवसांपासून महावितरणचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिक, शेतकरी हैराण झाले आहेत. वीज पुरवठा खंडित असल्याने गावच्या पाणी पुरवठा योजनांचे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत गावकऱ्यांना विहिरी, कुपनलिकांचा आधार घेऊन पाण्याची तहान भागवावी लागत आहे.

ऐन दिवाळीत गावात पाणी नसल्याने ग्रामस्थ, विशेषता महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दिवाळी सण असल्याने विविध भागातून नातेवाईक आपल्या मूळ गावी सणानिमित्त आले आहेत. घरात पाहुण्यांची वर्दळ आहे. अशा परिस्थितीत गावात आणि घरात पाणी नसल्याने कुटुंबीयांची धांदल उडाली आहे. आतापर्यंत शुकशुकाट अससलेल्या गावच्या बाहेरील आणि गावातील विहिरींवर महिलांची पाण्यासाठी झुंबड उडाल्याचे दृश्य आहे.

मुरबाड, सरळगाव, संगम, भादाणे पंचक्रोशीतील गावांमध्ये भात कापणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकरी यांत्रिक पध्दतीने भात कापणी करत आहेत. विद्युत पुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांनी भात कापणीची कामे खोळंबली आहेत. घरांमधील विजेवर चालणारे पंखे, शीतकपाटे बंद आहेत. वाढता उकाडा आणि त्यात घरातील पंखे बंद असल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे.

महावितरणच्या स्थानिक कार्यालयांमध्ये फेऱ्या मारून, तक्रारी करूनही त्याची दखल कर्मचारी, अधिकारी घेत नाहीत, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. मागील आठवड्यापासून संध्याकाळच्या वेळेत परतीचा पाऊस विजांच्या गडगडाटासह कोसळत आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी चक्री वारे वाहत आहेत. या वारा पावसामुळे मुरबाड तालुक्यातील सरळगाव, संगम परिसरातील विजेचे खांब झाडांवर, जमिनीवर कोसळले आहेत. अनेक ठिकाणी रोहित्रांमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे ही व्यवस्था सुस्थितीत करण्यासाठी महावितरणचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पडझड झालेल्यांचे प्रमाण अधिक आणि त्याप्रमाणात मनुष्यबळ कमी असल्याने त्याचा फटका नागरिकांना वीज बंदच्या माध्यमातून बसत आहे. भात कापणी करून घराजवळील खळ्यात आणलेले भात अनेक शेतकरी रात्रीच विजेच्या प्रकाशात झोडून पोत्यात भरून घरात भरून ठेवतात. गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा नसल्याने शेतकऱ्यांना ही कामेही करता येत नाहीत, अशा तक्रारी संगम, सरळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केल्या.

दिवाळीनिमित्त वर्षभरात गावी आलेल्या पाहुण्यांचा अंधाऱ्या दिवाळीमुळे हिरमोड झाला आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री वीज पुरवठा नसल्याने पंखे बंद असल्याने डासांचा हल्ला यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. महावितरणने वारा पावसामुळे झालेली पडझड लवकर सुस्थितीत करावी आणि वीज पुरवठा सुरू करावा. अन्यथा महावितरणच्या सरळगाव कार्यालयावर मोर्चा काढण्याचा विचार या भागातील नागरिक करत आहेत.

ऐन दिवाळीत मागील तीन दिवसांपासून सरळगाव, संगम परिसरातील पंचक्रोशीत वीज पुरवठा नाही. विजेवर चालणारी सर्व यंत्रणा बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यापासून शेतीची यांत्रिक पध्दतीने होणारी कामे खोळंबली आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या खंडित वीज पुरवठ्याची गंभीर दखल घ्यावी. – दीपक रत्नाकर, संगम गाव, सरळगाव.