ठाणे : भिवंडी येथील नेहरूनगर भागातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा खून झाल्याचा प्रकार पाच वर्षानंतर उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मौलाना गुलाब उर्फ गुलाम रब्बानी शेख याला उत्तराखंडमधून अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. या मुलाचा खून करून त्याला ज्या ठिकाणी गाडण्यात आले होते, त्याठिकाणी त्या मुलाचे अवशेष पोलिसांना सापडले आहेत.
भिवंडी येथील नेहरूनगरमधील नवी वस्ती परिसरातून एक १६ वर्षीय मुलगा पाच वर्षांपुर्वी बेपत्ता झाला होता. याप्रकरणी त्याच्या कुटूंबियांनी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी सर्वत्र शोध घेऊनही त्याचा तपास लागला नव्हता. मुलगा बेपत्ता झाल्यापासून गुलाब उर्फ गुलाम रब्बानी शेख हा फरार झाला होता. यामुळे त्याच्या कुटूंबियांनी गुलाब उर्फ गुलाम रब्बानी शेख याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याच काळात गुलाब याच्याविरोधात भिवंडी शहर पोलिस ठाण्यात अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता.
या गुन्ह्याचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला होता. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता शोध गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ घार्गे, सहाय्यक पोलिस निरक्षक अब्दुल मलिक, शिवाजी गायकवाड, नगराज रोकडे यांच्या पथकामार्फत त्याचा शोध सुरू होता. त्याचदरम्यान, पोलिस नाईक सचिन कोळी यांना त्याच्या ठावठिकाण्याबाबत माहिती मिळाली होती. उत्तराखंड येथील रुडकीपासून काही अंतरावर असलेल्या मुक्कामपुर येथील मशीदमध्ये तो राहत होता. तेथे जाऊन पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने मुलाचा मृतदेह भिवंडीतील नेहरुनगरमधील त्याच्या किराणा दुकानाच्या बाजुच्या गाळ्यामध्ये पुरला होता. याबाबत त्याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे जाऊन पाहाणी केली असता, त्यांना मुलाचे अवशेष सापडले.
हत्या का केली?
गुलाब उर्फ गुलाम रब्बानी शेख हा परिसरातील एका लहान मुलावर अनैसर्गिक कृत्य करत होता. हे कृत्य करताना हत्या झालेल्या १६ वर्षीय मुलाने पाहिले होते. हे प्रकरण त्याने इतर कोणाला सांगितले तर, आपले बिंग फुटेल, अशी भिती गुलाबला सतावत होती. यातूनच त्याने त्या १६ वर्षीय मुलाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह नेहरुनगरमधील त्याच्या किराणा दुकानाच्या बाजुच्या गाळ्यामध्ये पुरला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ घार्गे यांनी दिली.