लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभा ठाणे जिल्ह्यातील मतदानाच्या पूर्व संध्येला घेण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये १२ मे रोजी जाहीर सभा जाहीर करण्यात आली होती. परंतु, भाजपच्या केंद्रीय प्रचार समिती आणि स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार करून ही सभा येत्या १५ मे रोजी घेण्यात येणार आहे. कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स गृहसंकुलाजवळील प्रशस्त मैदानात या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता ही सभा होईल, असे महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपील पाटील यांनी सांगितले.

आणखी वाचा-मागील दहा वर्षात थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांकडे खरेदीदारांची पाठ

१२ मे रोजीची सभा ही केंद्रीय प्रचार समितीकडून आलेल्या निरोपानुसार रद्द करण्यात आली. यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. परंतु, भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे कपील पाटील यांच्या विरुध्द राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे, नीलेश सांबरे यांच्या बरोबर लढत होणार आहे. हा गड सहजासहजी राखणे भाजपला यावेळी जड जात असल्याने अखरेच्या टप्प्यात मोदी यांना सभेसाठी आणण्यात येत असल्याचे स्थानिक पदाधिकारी सांगतात.

महायुतीला पाठिंबा दि्ल्यापासून मनसेचे राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते जाहीर सभा घेत आहेत. कल्याणमध्ये एक सभा घेण्याचे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांच्या मागणीवरून राज ठाकरे यांनी दिले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात ही सभा होण्याची चिन्हे आहेत. फक्त ही सभा कोठे घेतली जाते याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. मनसेने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असला तरी स्थानिक मनसेच्या कार्यकर्त्यांचे शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांबरोबर मनोमिलन होत नसल्याची कुजबुज आहे. या कुजबुजीमुळे राज ठाकरे यांची कल्याणमध्ये सभा होणार की नाही याविषयी शंका व्यक्त केल्या जात आहेत. काही ठिकाणी शिवसेना,भाजप मध्ये कुरबुरीचे राजकारण आहे.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात ८४ उमेदवारांमध्ये रंगणार निवडणूक, अर्ज माघारीच्या दिवशी १२ जणांनी घेतली माघार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण आणि भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर, सुरेश म्हात्रे यांच्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेची तारीख किंवा त्यांच्या या भागातील दौऱ्याचे अद्याप कोणतेही नियोजन उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही