ठाणे : ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी संसद रत्न पुरस्कारावरून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर ‘बच्चा नया है’ असे म्हणत टीका केल्यानंतर म्हस्के यांनीही राजन विचारे यांच्यावर टीका केली. होय, राजन विचारे आजोबा…. मी बच्चाच आहे…. असे प्रत्युत्तर नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांना दिले. खरच इतक वाईट वाटत ना… तुम्ही लोकसभा हरलातच, विधानसभेतही तुम्हांला गाशा गुंडाळावा लागला. आता कदाचित महानगरपालिकेलाही उभे राहाल! चांगलं आहे, माणसाने प्रयत्नवादी असले पाहिजे. पण आजोबा, बच्चा मोठा होत असतो आजोबाचं काय होतं?? अशी टीकाही त्यांनी केली.
काही दिवसांपूर्वीच खासदार नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांना पुरस्कार मिळताच, ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी टीका केली. त्यांना संसद रत्न पुरस्कारा ऐवजी वाचाळवीर पुरस्कार द्यायला हवा होता. कारण संसदेत ते कमी असतात. पण इतर ठिकाणी बोलायला पुढे असतात. कारण नवीन आहेत ते.. बच्चा नया है… असे राजन विचारे हे म्हस्के यांना म्हणाले. त्यानंतर म्हस्के यांनी एक्स या समाजमाध्यमावर ट्विट करत राजन विचारे यांच्यावर टीका केली. म्हस्के म्हणाले, होय राजन विचारे आजोबा, मी बच्चाच आहे.. आणि मोठा होतो आहे…. तुम्ही संसदेत गेलात तेव्हापासून तुम्ही थकलेलेच आहात. एकदा काय पोळी वरून नाटक केलं, तेवढंच लोकांच्या लक्षात आहे.
लोकसभा हरलात, विधानसभेतही गाशा गुंडाळावा लागला
ना तुम्ही कधी प्रश्न विचारले, ना ठाण्याच्या लोकांच्या समस्या संसदेत मांडल्या. त्यामुळेच संसदरत्न काय भानगड आहे हे तुम्हाला कळणारच नाही. त्याला निकष आहेत. केवळ लोकांनी निवडून दिले म्हणून तो पुरस्कार दिला जात नाही. खरच इतक वाईट वाटत ना, तुम्ही लोकसभा हरलातच, विधानसभेतही तुम्हाला गाशा गुंडाळावा लागला. आता कदाचित महापालिकेलाही उभे राहाल!! चांगलं आहे, माणसाने प्रयत्नवादी असलं पाहिजे. पण आजोबा, बच्चा मोठा होत असतो आजोबाचं काय होत?
मानसोपचार करुन घ्या…
तुम्हाला इंटरनेटवर चेक करता येतं का? नसेलच. कोणी सुशिक्षित कार्यकर्ता चुकून आजूबाजूला बाळगला असलाच तर त्याला विचारा संसदरत्न पुरस्कार म्हणजे काय? तो कोणाला दिला जातो? का दिला जातो?
तुम्ही किती वर्ष संसदेत होता? तिथे जाऊन काय करत होता? गुंडगिरी करायलाच पाठवले होते का? ना ठाणेकरांना तुम्ही तुमच्या कामाचा रिपोर्ट सादर केला, ना संसदेत ठाणेकरांच्या समस्या मांडल्या. त्यामुळे, तुम्हाला अशा काही गोष्टींची जाणीव असणे शक्यच नाही. पण, तरीसुद्धा, तुमची खूप कीव येते. थोडे मानसोपचार करून घ्या. महानगरपालिकेसाठी ते बरं राहील. अन्यथा तिथेही हातात भोपळा मिळाला तर पार वाईट मानसिक अवस्था होईल हो आजोबा. असे म्हणत त्यांनी राजन विचारे यांना प्रत्युत्तर दिले.