ठाणे : नौपाडा येथील प्रशांतनगर भागात झोपडपट्टी पूनर्वसन विकास प्रकल्प मागील १२ वर्षांपासून रखडला आहे. पुरेशी संधी आणि वेळ देऊनही विकासक रहिवाशांना घरे देण्यास असमर्थ ठरत असल्याने झोपडपट्टी पूनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) बैठकीत आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला. तर एसआरए विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी विकासकाला १५ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. मुदतीत निर्देशांचे पालन झाले नाही तर नवीन विकासक नेमण्याचा इशाराही त्यांनी दिला.

नौपाडा परिसरातील प्रशांत नगर ही जुनी वसाहत आहे. येथे १२ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एसआरए प्रकल्पाचे काम एसटीजी ग्रुपचे हरीश दौलतानी यांनी हाती घेतले आहे. गेल्या १२ वर्षात विकासकाला इमारती पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयश आले असून रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित राहिले आहेत. विशेष म्हणजे रहिवाशांना नियमित भाडे देण्यातही विकासक अपयशी ठरल्याचा दावा रहिवाशांनी केला. याबाबत येथील श्री स्वामी समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेने आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षापासून लढा सुरू ठेवला आहे. त्यानुसार केळकर यांनी विकासक, रहिवासी, ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि एसआरए अधिकारी यांच्यात समन्वय साधून बैठकाही घेतल्या तसेच विकासकाला पुरेशी संधी आणि वेळही दिली. तरीही विकासक प्रकल्प पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने केळकर यांनी एसआरए विभागाच्या कार्यालयात संयुक्त बैठक घेतली. यावेळी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते.

विकासकाला पुरेशी संधी आणि वेळ देऊनही विकासक घरे देण्यास तो अपयशी ठरला आहे, रहिवाशांचे भाडे नियमित देण्यासही टाळाटाळ केली, विभागाने दिलेल्या निर्देशांना केराची टोपली दाखवून रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप केळकर यांनी केला. विकासकाला अंतिम मुदत देण्याची आणि त्यानंतरही त्याने टाळाटाळ केली तर त्याच्यावर कारवाई करून नवीन विकासक नेमण्याची मागणी केळकर यांनी केली. यावर सोमण यांनी विकासकाला १५ दिवसांची अंतिम मुदत दिली तसेच मुदतीत निर्देशांचे पालन झाले नाही तर नवीन विकासक नेमण्याचा इशाराही त्यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकासकाला पाठीशी घालणाऱ्यांना सोडणार नाही…

विकासकाने गेल्या १२ वर्षांत रहिवाशांच्या आणि विक्रीच्या इमारती देखील अपूर्णच ठेवल्या असून रहिवासी आणि इतर खरेदीदारांची फसवणूक केली आहे. घोडबंदरमध्ये देखील या विकासकाने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत नगर येथील रहिवाशांची देखील त्याने फसवणूक केली असून विकासकाला कोणी पाठीशी घालणार असेल तर त्यांनाही आम्ही सोडणार नाही, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.