ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आज, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते होत असतानाच या प्रकल्पाच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी सातत्याने चर्चा होताना दिसत आहे. या विमानतळाला आधुनिकतेचा साज चढला आहे. कमी दृश्यमानतेतही सुरक्षित विमान उतरवू शकणे, ‘जेन-झी’साठी तंत्रस्नेही यंत्रणा, दुबई किंवा हिथ्रो विमानतळासारखे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र बनवण्याचा हेतू अशा विविध आधुनिक यंत्रणांनी हा विमानतळ आता सज्ज होणार आहे. लंडनस्थित झहा अदीद या जगविख्यात वास्तूविशारद कंपनीने विमानतळाचे संकल्पचित्र तयार केले. त्यामुळे आता हे विमानतळ कसे असेल याची उत्सुकता विमान प्रवाशांना आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमीटेड आणि सिडकोच्या संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या उद्घाटनाची जय्यत तयारी केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू आहे. विमानतळाचे विविध चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. विमानतळ सुरु झाल्यानंतर त्याची पहिली दृश्य टिपण्यासाठी नागरिक सज्ज आहेत.
देशाचे राष्ट्रीय फुल कमळावर आधारित स्टील आणि काचेपासून तयार केलेले तरंगते कमळ हे या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचे आकर्षण असणार आहे. या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलला चार महत्वाची प्रवेशद्वार असणार आहेत. तसेच तीन महत्वाची केंद्र येथे असतील. या केंद्रांना अल्फा, ब्रावो आणि चार्ली अशी नावे देण्यात आली आहेत. विमानतळावर एकूण ८८ तपासणी केंद्र असतील. त्यामध्ये ६६ पारंपरिक स्वरूपातील आणि २२ स्वंय तपासणी केंद्र असतील. ही व्यवस्था देशातील मोठ्या विमानतळांपैकी एक असल्याचे सांगितले जाते.
सुरुवातीच्या एका महिन्यासाठी उड्डाणे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु असतील. कोणती विमान कंपनी उड्डाणे घेईल याविषयी स्पष्टता नसली तरी इंडिगो कंपनीचे विमान येथून पहिल्यांदा आकाशात झेपावेल असे बोलले जात आहे. एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर या तीन विमान कंपन्यांनी अदानी कंपनीसोबत करार केले आहेत. त्यामुळे विमानतळावरुन पहिले व्यावसायिक विमान कोणत्या कंपनीचे असेल याविषयी उत्सुकता कायम आहे. विमानतळात चार टर्मिनल आणि दोन समांतर धावपट्ट्यांचा असतील.
पहिली धावपट्टी लांबी ३ हजार ७०० मीटर आणि रुंदी ६० मीटर असेल तर दुसरी धावपट्टी ३ हजार ७०० मीटर लांब आणि रुंदी ६० मीटर असेल. परंतु सध्या फक्त एक धावपट्टी आणि एकच टर्मिनल कार्यरत असेल. दुसऱ्या टर्मिनलचा आराखडा सुरू झाला आहे आणि अदानी समूह या दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
प्रतीक्षा वेळ दाखवणारे गेट्स, डीजी यात्रा आणि स्मार्ट इमिग्रेशन प्रक्रिया
सध्याचे ६४ टक्के प्रवासी झेन जी आणि मिलेनियल्स आहेत. त्यामुळे हे विमानतळ तंत्रज्ञानप्रेमी आहे. त्यामुळे सर्व प्रवेशद्वारावर डीजी यात्रा सक्षम असतील. आणि ट्रस्टेड ट्रॅव्हलर कार्यक्रमाच्या माध्यमातून इमिग्रेशन रांगेत थांबण्याची आवश्यकता नाही. प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रतीक्षा वेळेचीही माहिती दिली जाईल.
१०० विमान स्टँडची योजना
अतिमहत्त्वाची व्यक्ती तसेच खासगी विमान वाहतुकीची गरज पूर्ण करण्यासाठी अंतिम टप्प्यात जवळपास १०० जीए विमानस्टँड असलेले जीए टर्मिनल बांधण्याची योजना आहे.
ठाणे जिल्ह्यातील बुलेट ट्रेन आणि विमानतळ जोडले जाणार
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या ठाणे जिल्ह्यात सुरु आहे. हा बुलेट प्रकल्प देखील विमानतळाशी जोडला जाणार आहे. ठाणे-नवी मुंबई उन्नत मार्ग, मेट्रो आठ मार्गिका विमानतळाशी जोडली जाणार आहे. भविष्यातील जल वाहतूक देखील या विमानतळाला जोडेल.