ठाणे : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याआधी शिंदेच्या शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी पदाधिकाऱ्यांसह राज्य निवडणुक आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवी मुंबईच्या प्रभाग रचनेवर ठाण्याचा प्रभाव असल्याची चर्चा होती आणि या रचनेबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रारी केली होती. यामुळे प्रभाग रचनेवरून शिंदेची शिवसेना आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांच्यात वाद रंगला असतानाच, म्हस्के यांनी निवडणुक आयुक्तांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी २८ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यानुसार पालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार करून ती प्रसिद्ध केली होती. यानंतर प्रारुप प्रभाग रचनेविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. प्रभाग रचनेविरोधात नवी मुंबई महापालिकेकडे २५५१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारी नोंदविणाऱ्यांमध्ये नाईक समर्थकांचा समावेश होता.
वनमंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक आणि त्यांचे पुतणे व माजी महापौर सागर नाईक यांनीही प्रभाग रचनेबाबत नाराजी व्यक्त केली होती. नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर ठाण्याचा प्रभाव असल्याची चर्चा सुरूवातीपासून होती. या रचनेवरून शिंदेची शिवसेना विरुद्ध गणेश नाईक असा सामना रंगल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेतर्फे गणेशोत्सवाच्या सुरवातीला प्रारुप प्रभागरचना जाहीर केली होती. प्रारुप प्रभागरचनेवर हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यात आली. नवी मुंबई महापालिकेकडे २५५१ हरकती सूचना घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी अंतिम केलेली प्रभागरचना राज्य शासनाकडे सादर केली होती.
गणेश नाईक यांनी प्रभाग रचनेप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान, तक्रारी आणि हरकती सुचना निकाली काढत प्रारुप रचनेच्या आधारे अंतिम करण्यात येणार आहे. गणेश नाईक आणि त्यांच्या समर्थकांनी नोंदविलेल्या आक्षेपानंतर राजकीय सुत्रे हलल्याची चर्चा होती. असे असतानाच, अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याआधी शिंदेच्या शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी पदाधिकाऱ्यांसह राज्य निवडणुक आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.