भाईंदर:- शारदीय नवरात्री निमित्त भाईंदर शहरात उत्साहाचे वातावरण असून यानिमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ऐतिहासिक धारावी देवी मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही देवीचा जागर सुरु आहे. मंदिरात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे.

भाईंदर पश्चिमेच्या निसर्गरम्य समुद्र किनारी वसलेल्या तारोडी गावात धारावी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर तीनशे वर्षाहून अधिक जुने असल्याचे म्हटले जाते. नरवीर चिमाजी आप्पांनी वसई मोहिमेच्या वेळी या मंदिराची उभारणी केली असावी असे मानले जाते. मंदिराच्या गाभारत पुरातन धारावी देवीची मूर्ती आहे. हे मंदिर भाईंदरवासियांसह वसई, पालघर आणि नवी मुंबई येथील आगरी कोळी समाजाचे श्रद्धास्थान आहे.

मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात मंदिरात धूप आरती, महापूजा, भजन, कीर्तन, हरिपाठ, पालखी सोहळा यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी शहरातील भाविकांसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

धार्मिक कार्यक्रमाबरोबर गरब्याचे आयोजनही मंदिराकडून केले जाते. मंदिरचे व्यवस्थापन आई धारावी देवी न्यासातर्फे पाहिले जाते. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, मंदिराची देखभाल न्यासाकडून केली जाते. नवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पाणी, नाश्ता तसेच स्वच्छतागृह आदींची व्यवस्थाथा न्यासाकडून करण्यात आली आहे.

जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात

धारावी देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या दोन वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे. यात मंदिराला भव्य स्वरूप देण्यात येणार असून यासाठी खास काळ्या पाषाणाचा वापर केला जात आहे. यासाठी जवळजवळ ३ कोटीहून अधिक खर्च केला जाणार आहे. सध्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच भाविकांना धारावी देवीचे मंदिर नव्या स्वरूपात पाहता येणार आहे. तसेच शासनाकडून देखील मंदिरासाठी विशेष निधी देण्यात आला असून त्याद्वारे संरक्षण भिंत, हायमास दिवे आणि इतर सुशोभीकरणाचे काम केले जात आहे.