राज्यातील आगामी महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप या दोन पक्षांच्या युतीसाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना बदलापूर आणि अंबरनाथ अशा दोन्ही शहरांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास मात्र बिघाडीच्या दिशेने सुरू झाला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता या दोन्ही शहरांमध्ये आघाडी व्हावी, असे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू झाले होते. परंतु जागावाटपाच्या मुद्दय़ावरून या दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते आतापासूनच एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढू लागल्याने आघाडीची चर्चा हवेतच विरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने बदलापुरात लढविलेल्या यापूर्वीच्या जागा सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला असून, आतापासूनच नकारघंटा सुरू असेल, तर निवडणुकीत संसार कसा टिकायचा, असा सवाल काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित करू लागले आहेत.  
बदलापूर नगरपालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते सुरुवातीला उत्सुक होते. विधानसभा निवडणुकीत अंबरनाथ, बदलापूर अशा दोन्ही शहरांमध्ये दोन्ही काँग्रेसचा अक्षरश धुव्वा उडाला. अंबरनाथ येथे तर राष्ट्रवादीच्या प्रदेश स्तरावरील नेत्याला डिपॉझिट राखताना घाम फुटला. आमदार किसन कथोरे यांनीही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्याने या दोन्ही शहरांमधील पक्षाची अवस्था अगदीच तोळामासा बनली आहे. या पाश्र्वभूमीवर नगरपालिका निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी करून शिवसेना-भाजपपुढे किमान आव्हान उभे करावे, अशी व्यूहरचना आघाडीच्या नेत्यांकडून आखली जात होती. राज्य पातळीवरील नेत्यांनीही आघाडी करण्यासंबंधीचा विषय स्थानिक नेत्यांच्या पारडय़ात भिरकावला होता. असे असताना जागा वाटपाच्या मुद्दय़ावरून या दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये बेबनाव सुरू झाल्याने आघाडीची चर्चा हवेतच विरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
यापूर्वी लढलेल्या प्रभागांवरील हक्क सांगण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते तयार नाहीत. काँग्रेसला अपेक्षित असलेल्या प्रभागांवर राष्ट्रवादीने दावा केल्याचे समजते आहे. दरम्यान, आघाडीच्या मुद्दय़ावर दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांमध्ये एक बैठक झाली असून, दुसरी बैठक गुरुवारी रात्री उशिरा होणार असल्याचे कळते आहे. परंतु ही दुसरी बैठक अंतिम बैठक असून या बैठकीत तोडगा न निघाल्यास जागा वाटपाच्या मुद्दय़ावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख प्रयत्नशील आहेत. ऐनवेळेला तारांबळ उडू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बदलापुरात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांच्या उपस्थितीत ५५ इच्छुकांच्या मुलाखती राष्ट्रवादीने घेतल्या आहेत. तर काँग्रेसच्या मुलाखती माजी मंत्री रवी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडल्या आहेत. दोन्ही पक्षांची ताकद तोळामासा असल्याने आघाडी केल्यास या पक्षांचे किमान आव्हान तरी उभे राहील, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. परंतु पहिल्या बैठकीनंतर काही जागांवर घोडे अडल्याचे कॉँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याने सांगितले.