ठाणे : शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सातत्याने सांगत होते की प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन विकास आघाडी ही आमच्या सोबत आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी आता उमेदवार जाहीर केल्यामुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचा डाव फिस्कटला आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली. विजय शिवतारे यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यास शिवसेना त्यांच्यावर कारवाई करेल आणि या कारवाईनंतर मग राष्ट्रवादी त्यांना उत्तर देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सातत्याने पत्रकार परिषद घेऊन सांगत होते की प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन विकास आघाडी हा पक्ष महाविकास आघाडी सोबत आहे. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी आता आठ ते नऊ उमेदवार जाहीर केले आहे. यामुळे बहुजन विकास आघाडी हा पक्ष महाविकास आघाडी सोबत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तसेच शिवसेनेने आज लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची यादी जाहीर करताच सांगलीच्या जागेवरून काँग्रेसमधून नाराजीचा सुरू उमटू लागला आहे. त्याचबरोबर मुंबईत संजय निरुपम यांच्यासह इतर पदाधिकारीही नाराज आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचा डाव फिस्कटला आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली.

हेही वाचा : ठाण्यात राजन विचारे यांचे शिंदे गटासमोर आ‌व्हान, कल्याणमध्ये उमेदवाराचा शोध सुरूच

विजय शिवतारे यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यास शिवसेना त्यांच्यावर कारवाई करेल आणि या कारवाईनंतर मग राष्ट्रवादी त्यांना उत्तर देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच विजय शिवतारे यांनी कधीही उमेदवारी अर्ज भरावा. पण, त्यांनी अर्ज भरल्यानंतर शिवसेना हे नाव त्यांच्यापासून वेगळे होईल आणि मग त्यांना त्यांचे पुरंदरमध्ये काय अस्तित्व आहे, हे कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा : डोंबिवली: अनधिकृत ढाब्यांविरोधात हॉटेल चालकांची गुरुवारी बंदची हाक

जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

जो नाही झाला कार्यकर्त्यांचा, तो काय होणार पक्षाचा अशी टीका आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली.