ठाणे : नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या विद्युत बसगाडीच्या विजेरीची चार्जिंग कमी असल्याने चालकाने भिवंडीतील पुर्णा बसथांब्याऐवजी त्याआधी असलेल्या काल्हेर थांब्यावरच प्रवाशांना उतरविले. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी वाहकाला जाब विचारत मारहाण केली. यात वाहक जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चालकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेची ‘एनएमएमटी’ ही विद्युत बसगाडी ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सिडको बसथांबा येथून भिवंडीतील पूर्णापर्यंत वाहतुक करते. सोमवारी या बसगाडीच्या विजेरीची चार्जिंग कमी असल्याने ही बसगाडी काल्हेर येथील जलवाहिनी पर्यंत चालविण्याचा निर्णय एनएमएमटीच्या नियंत्रकांनी घेतला. बसगाडीमध्ये चढताना याबाबत प्रवाशांना माहिती देण्यात आली होती.

बसगाडी पूर्णापर्यंत जाणार नसल्याने काही प्रवाशी बसगाडीत बसले नाही. तर काही प्रवासी त्या बसगाडीमध्ये बसले. बसगाडी काल्हेर जलवाहिनीपर्यंत पोहचली. त्यानंतर चालकाने ही बसगाडी पुढे जाणार नसल्याचे प्रवाशांना सांगितले. त्यामुळे संतापलेल्या दोन महिला आणि दोन पुरुष प्रवाशांनी चालक आणि वाहकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांना धमकावून शिवीगाळ करण्यात आली. हा वाद इतका विकोपाला गेला की, प्रवाशांनी त्या वाहकाला बेदम मारहाण केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती चालकाने दिल्यानंतर त्यांचे अधिकारी तेथे पोहचले. वाहकाला ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरुवारी चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.