डोंबिवली : दिवाळी सणाच्या पाच दिवसांच्या कालावधीत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात दिग्गज शास्त्रीय संगीत गायक, इतर संस्थांचे भरगच्च सांगीतिक कार्यक्रम पहाटेच्या वेळेत असतात. या पाचही दिवशीच्या भल्या पहाटे सुरू होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना डोंबिवली शहर परिसरातील रसिक प्रेक्षकांचा भरगच्च प्रतिसाद असतो. दिवाळीच्या काळात आपले कार्यक्रम डोंबिवलीत लागावेत म्हणून अनेक आयोजक संस्था प्रयत्नशील असतात. पण, यावेळी कल्याण डोंबिवली पालिकेचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली मागील पाच महिन्यांपासून बंद असल्याने डोंबिवलीतील रसिक प्रेक्षकांचा हिरमोड झाला.
शास्त्रीय संगीताचे गायन, विविध प्रकारचे सांगीतिक कार्यक्रम यांचा दर्दी रसिक प्रेक्षक वर्ग डोंबिवलीत अधिक प्रमाणात आहे. या रसिक प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून अनेक आयोजक संस्था डोंबिवलीत सावित्रीबाई फुले रंगमंदिरात दिवाळी सणाच्या काळात दिवाळी पहाटचे सांगीतिक, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करण्यासाठी उत्सुक असतात.
डोंबिवली शहराबाहेर एकांतात, रिक्षेने प्रवासासाठी थोडे अडगळीचे आणि रिक्षा प्रवासी भाड्यात महागडे वाटत असले तरी डोंबिवलीतील ज्येष्ठ, वृध्द, तरूण, उमद्या गटातील नागरिक आवर्जून पहाटेच्या वेळेतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असतो. यावेळी श्री गणेश मंदिर संस्थाचा कार्यक्रम आणि इतर शहराच्या विविध भागातील सांगीतिक कार्यक्रम सोडले तर सावित्रीबाई फुले रंगमंदिरात सकाळच्या वेळेत तेथील वातानुकूलित सुगंधित मनमोहक दरवळाच्या वातावरणात बसून दिवाळी पहाटचा आनंद घेता न आल्याने डोंंबिवलीतील अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
मे महिन्याच्या अखेरीस सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील प्रेक्षागृहातील छताचा प्लास्टर ऑफ पॅरिसचा एक खपला गळून पडला होता. ही फार मोठी घटना नव्हती. प्रेक्षागृहात यावेळी कोणीही नव्हते आणि कोणतीही दुर्घटना घडली नव्हती. तुटलेला भाग पुन्हा सुस्थितीत करून नाट्यगृह पुन्हा सुरू करू, अशी काही पालिका अधिकाऱ्यांची मानसिकता होती. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील प्रत्येक कामात हस्तक्षेप करण्याची सवय असलेल्या एका विकासपुरूष वजनदार लोकप्रतिनिधीने सावित्रीबाई फुले प्रेक्षागृहातील तुटलेल्या पीओपीचा बाऊ करून संपूर्ण सावित्रीबाई फुले नाट्यगृहचा पुनर्विकास करणे कसे गरजेचे आहे. हे नाट्यगृह कसे जुने झाले आहे, असा देखावा उभा करून या विकासपुरूष लोकप्रतिनिधीने तत्कालीन वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांमागे तगादा लावून संपूर्ण सावित्राबाई फुले नाट्यगृहाचा पुनर्विकास करण्यासाठी तगादा लावला.
यासाठी सुमारे दीडशे कोटीच्या निविदेचा आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. पालिका तिजोरीत पैसा नाही आणि शासन एकरकमी एवढा निधी देणार नाही, असा विचार करून तत्कालीन वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने विकासपुरूषाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. आपण शासनाकडून निधी आणून देतो, असा या विकासपुरूष लोकप्रतिनिधीचा दावा होता, पालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. या लोकप्रतिनिधीच्या रेट्याने आपण नाहक निविदेवरील स्वाक्षऱ्यांमध्ये आपण अडकू, हा लोकप्रतिनिधी जाईल निघून जाईल. आणि आपणास नंतर उत्तरे द्यावी लागतील, असा दूरगामी विचार करून पालिका अधिकाऱ्यांनी हे प्रकरण थंडपणाने हाताळले.
पालिका अधिकारी आपणास दाद देत नाहीत पाहून हा विकासपुरूष लोकप्रतिनिधीही मग थंडावला. आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे तात्पुरते होणारे डागडुजीकरण रखडले. आणि त्याचा फटका डोंबिवलीतील नाट्य रसिकांना बसला. आता शासनाने १५ कोटी उपलब्ध करून दिलेत त्यामधून नुतनीकरणाची कामे सुरू होतील.
