अंबरनाथ: “विकास प्रकल्पांमध्ये राजकारण नको, लोकांच्या हिताचे काम एकत्र येऊन पूर्ण करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे,” असा सल्ला शिवसेनेचे ( शिंदे गट) कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील कार्यकर्त्यांना दिला. अंबरनाथ शहरातील सुरु असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेताना ते बोलत होते. सोमवारी खासदार डॉ. शिंदे यांनी अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प, नाट्यगृह आणि अटल सूर्योदय उद्यान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची सखोल पाहणी केली. यावेळी शिवसेना आणि भाजप या महायुतीतील पक्षांच्या माजी नगरसेवकांमध्ये टोलेबाजी व शब्दयुद्ध रंगले. या प्रसंगी शांततेने दोन्ही पक्षांना सल्ला देताना डॉ. शिंदे म्हणाले, विकास हीच आपली प्राथमिकता आहे. जनतेच्या कामात राजकारण मिसळल्यास नागरिकांचा विकास अडतो. म्हणून सर्वांनी एकत्र येऊन कामे पूर्ण करू या.

शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पाला वेग

प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले अंबरनाथचे शिवमंदिर सुमारे ९०० वर्षांहून अधिक जुने असून शहराची ओळख मानले जाते. या मंदिराला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी सुमारे १४० कोटी रुपयांच्या निधीतून “शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प” राबविण्यात येत आहे.काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर या प्रकल्पात भव्य प्रवेशद्वार, काळ्या पाषाणातील सौंदर्यवर्धन, वाहनतळ, भक्तनिवास, प्रदर्शन केंद्र, नंदीमूर्ती, चेकडॅम, संरक्षक भिंत आणि घाट उभारणीचा समावेश आहे. सध्या घाट उभारणीचे काम जलद गतीने सुरू असून, लवकरच भाविकांना काशीप्रमाणे घाट आरतीचा अनुभव मिळणार आहे. तसेच प्राचीन कुंडाचे काम पूर्णत्वास आले असून, भक्तनिवासाचे कामही सुरू आहे.

३८.७१ कोटींचे नाट्यगृह

अंबरनाथ पश्चिम येथील सर्कस मैदानावर ३८.७१ कोटी रुपयांच्या निधीतून नाट्यगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. प्रशस्त, आधुनिक आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त हे नाट्यगृह लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

या नाट्यगृहात विविध नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कला सादरीकरणांचे आयोजन होणार असून, अंबरनाथ आणि परिसरातील नागरिकांसाठी हा एक सांस्कृतिक उत्सव ठरणार आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कामाचा आढावा घेतला आणि “कामे अखेरच्या टप्प्यात आहेत. नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी कोणतीही तडजोड होऊ नये,” अशा सूचना दिल्या.

अटल सूर्योदय उद्यान

अंबरनाथ पूर्वेतील साई सेक्शन परिसरातील अटल सूर्योदय उद्यानाचा विकास सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीतून होणार आहे. हे उद्यान नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी विश्रांती आणि आरोग्याचे केंद्र ठरणार आहे. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांनी नागरिकांनी मांडलेल्या सूचना ऐकून घेतल्या आणि “उद्यानाचा विकास नागरिकांच्या मतानुसार आणि त्यांच्या गरजांनुसार करण्यात येईल,” असे आश्वासन दिले. याच ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळाला.