करोनाकाळात हिंसाचाराच्या घटनांत वाढ; महिला संरक्षण विभागातील अधिकाऱ्याची माहिती

भगवान मंडलिक

डोंबिवली : डोंबिवलीतील सामान्यांबरोबर उच्चभ्रू कुटुंबीयांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण अधिक आहे. करोना महासाथीत मागील दीड वर्षांपासून हे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती कल्याण तालुका महिला संरक्षण अधिकारी भाग्यश्री बच्छाव यांनी दिली. पती, पत्नी वादाप्रकरणी महिला संरक्षण विभागाकडून न्यायालयाच्या आदेशावरून सुमारे ८५ जणांना नोटिसा पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  कल्याण परिसरात पती, पत्नी वादाप्रकरणी दर महिन्याला चार ते पाच तर वर्षांला ४० ते ५० तक्रारी दाखल होतात. पतीकडून होणारी छळवणूक, घटस्फोट अशा प्रकरणांत तीन महिन्यांच्या काळात सुमारे ८० ते ८५ नोटिसा देण्याचे काम महिला संरक्षण विभागाकडून न्यायालयाच्या आदेशावरून केले जाते.

घरांमध्ये गृहिणी, नोकरदार महिलांना पती, कुटुंबातील इतर सद्स्यांकडून त्रास देण्याचे प्रकार होत असतात. करोना महासाथीच्या मागील दीड वर्षांच्या कालावधीत हे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. करोना महासाथीच्या काळात टाळेबंदी, बेरोजगारी, कर्जबाजारीपणा अशा अनेक कारणांवरून पती पत्नीमध्ये वाद सुरू झाले. हे वाद अनेक प्रसंगी टोकाला गेले आहेत, असे बच्छाव यांनी सांगितले. कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी ठाणे जिल्ह्यात जिल्हा महिला आणि बाल विकास विभागांतर्गत एकूण १० महिला संरक्षण अधिकारी ठाणे, भिवंडी, शहापूर-मुरबाड, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा-भाईंदरमध्ये कार्यरत आहेत.  महिलेला घरात सतत टोचून बोलणे, शारीरिक- मानसिक त्रास देणे, तिची आर्थिक कोंडी करणे, तिच्या मनाला वेदना होतील असे सतत बोलत राहणे या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना आहेत, असे उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. शशांक देशपांडे यांनी सांगितले. अशा पीडितेला न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळून देता येतो, असे अ‍ॅड. देशपांडे यांनी सांगितले.

कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे महिला संरक्षण विभागामध्ये दाखल झाल्यानंतर पती, पत्नी यांचे समुपदेशन करून ही प्रकरणे पोलीस, न्यायालयापर्यंत जाणार नाहीत यासाठी प्रयत्न केले जातात. सामंजस्याने ही प्रकरणे मिटवून पीडित कुटुंबाचा सुखाने संसार चालेल या दृष्टीने प्रयत्न केले जातात. 

– भाग्यश्री बच्छाव, तालुका महिला संरक्षण अधिकारी, कल्याण