ठाणे : गणेशोत्सवात सर्वत्रच उत्साहाचे वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून सर्वत्र विविध सामाजिक संदेश देणारे देखावे पाहायला मिळत आहेत. सार्वजनिक गणपती मंडळांसह घरगुती गणेशोत्सवात देखील विविध आकर्षक, सामाजिक संदेश देणारे देखावे अनेकांनी साकारले आहेत. दरम्यान बदलापूरातील वाणी आळी येथील स्टार क्रीडा मंडळाने लुप्त होत असलेली स्वयंपाक घर पद्धतीचा देखावा साकारला आहे.

गणेशोत्सव हा केवळ भक्तीचा सण नसून समाजजागृती आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्याचे कार्य या उत्सवाच्या माध्यमातून केले जाते. या उत्सवाच्या माध्यमातून अनेक नागरिक विविध सामाजिक संदेश देणारे, विविध कलाकृतींचे दर्शन घडविणारे देखावे उभारत असतात. या देखाव्यांना पाहण्यासाठी नागरिक आवर्जून भेट देखील देतात. अशातच बदलापूर पूर्वेतील वाणी आळी येथील स्टार क्रीडा मंडळाचे यंदा ३८ वे वर्ष होते. दर वर्षी हे मंडळ समाजास नवनवीन सजावटीतून समाजप्रभोधन करण्याचे प्रयत्न करत असते.

या वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव या अंतर्गत मातीच्या बालगणेश रूपातली मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तर, देखाव्यात जुन्या काळाची आठवण आणि लुप्त होत चालेल्या भारतीय स्वयंपाक घरातली वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. नव्या पिढीस नव्या काळातील स्वयंपाक घरातील वस्तूंची माहिती आहे. याच नव्या पिढीला जुन्या काळातील गोष्टींची माहिती मिळावी या उद्देशाने मंडळाचे सदस्य रितेश पातकर यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकरण्यात आला. आज जुन्या काळातील वस्तू संग्रहालयात पाहण्यासाठी गर्दी होत असते. याच गोष्टीं गणेशाच्या देखाव्यात वापरण्यात आल्या आहेत. हा देखावा साकरण्यासाठी मंडळातील लहानांपासून मोठ्यांचा सहभाग होता.

देखाव्यामागील मुख्य उद्देश काय ?

या देखाव्यात जुन्या काळातील भांडी वापरुन सजावट केली असून पर्यावरणास घातक असलेल्या गोष्टींचा वापर टाळण्यात आला आहे. जुनं तेच सोनं या म्हणीनुसार जुन्या काळातील वस्तू वैभव असून पूर्वजांची आठवण आहे. संस्कृती जपणे हा या देखाव्यामागील मुख्य उद्देश आहे. ही सजावट करण्यास १५ दिवसाचा कालावधी लागला. देखाव्यात वापरण्यात आलेली भांडी ही मंडळाच्या सदस्यांच्या घरातून तसेच बदलापूर मधील विविध ग्रामीण भागातून गोळा करण्यात आली आहेत.

देखाव्यात नेमके काय ?

या देखाव्यात बालगणेशाची मूर्ती आहे. त्या बाजूला जुन्या स्वयंपाक घरातील वस्तू मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये तांब्या पितळेची पाण्याची भांडी, ताटे, डबे, पाटा वरंवटा, उखळ, धान्य मोजण्याचे माप, धान्याच्या गोणी, जुन्या काळातील बत्ती अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.