कल्याण : कल्याण जवळील उंबर्डे गावात गावातील घरा शेजारी स्वच्छतागृह बांधण्यावरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबीयांमध्ये वाद झाला. स्वच्छतागृह बांधण्यात येणारी जमीन आमच्या मालकीची आहे. तेथे स्वच्छतागृह बांधण्यात येऊ नये, अशी हरकत एका कुटुंबाने घेतली. त्याला बांधणाऱ्या कुटुंबाने विरोध करून स्वच्छतागृह बांधण्यासाठी ठाम भूमिका घेतली. यावरून दोन्ही गटात जोरदार राडा होऊन एका तरूणावर तलवारीने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले आहे. या तरूणाची प्रकृती चिंताजनक आहे.

विक्रांत जाधव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. घरा शेजारील कुटुंबीयांना हा हल्ला केल्याचा आरोप विक्रांतच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी जाधव कुटुंबीयांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की उंबर्डे गावात गावठाण हद्दीत विक्रांत जाधव आपल्या कुटुंबीयांसह राहतो. त्यांच्या घरा शेजारी गायकवाड कुटुंब राहते. विजय जाधव कुटुंब ज्या जागेत राहते. ती जागा आमच्या वहिवाटीची आहे, असा दावा गायकवाड कुटुंबीयांचा आहे. या जमिनीच्या वादावारून त्यांच्यात नेहमी धुसफूस होते.

विजय जाधव यांनी घरा शेजारील जागेत स्वच्छतागृह उभारणीचे काम हाती घेतले होते. त्या बांधकामाला गायकवाड कुटुंबीयांनी विरोध केला. विरोध असताना आठवड्यापासून जाधव कुटुंबीय स्वच्छतागृह उभारणीचे काम पूर्ण करत होते. हे काम थांबविले नाहीतर तुम्हाला धडा शिकवू, अशी धमकी गायकवाड कुटुंबीयांनी जाधव कुटुंबीयांना दिली होती, असे जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी सकाळी विक्रांत जाधव घरापासून काही अंतरावर असलेल्या पाणवठ्यावर पाणी आणण्यासाठी गेला होता. ही संधी साधत पाळत ठेऊन असलेल्या गायकवाड कुटुंबातील तरूणांनी विक्रांतला पाणवठ्याच्या भागात एकटा गाठून त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात विक्रांत जाधव गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. खडकपाडा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.