ठाणे : ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारी पहाटे वाढला. शहरात पहाटे तीन तासात ७५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात स्कुटरचे अर्धे चाक बुडेल इतके पाणी साचले होते. यामुळे येथील वाहतूक संथगतीने सुरू होती. तर, सिद्धेश्वर तलाव परिसरात संरक्षक भिंत पडल्याने रस्ता खचला असून यात कुणीही जखमी झालेले नाही.

ठाणे शहरात शहरात शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता. परंतु पावसाचा जोर फारसा नव्हता. शनिवारी पहाटे पावसाचा जोर वाढला. गेल्या चोवीस तासात शहरात १०४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी पहाटे ५.३० ते ८.३० या तीन तासात ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच काळात शहरातील सकल भागांमध्ये पाणी साचले होते. गजानन महाराज चौक वंदना सिनेमागृह जांभळी नाका पेढ्या मारुती मंदिर परिसर, कोपरी येथील बारा बंगला तसेच इतर सकल भागांमध्ये पाणी साचल्याने हा परिसर काहीसा जलमय झाला होता. येथे स्कूटरचे अर्धे चाक बुडेल इतके पाणी साचले होते.यामुळे या भागात वाहतूक काहीशी संथगतीने सुरू होती.

हे ही वाचा… डोंबिवली नांदिवली पंचानंंद येथील राधाई बेकायदा इमारतीच्या विकासकावर गुन्हा दाखल, भाजप कार्यकर्त्यांच्या अडचणीत वाढ

हेही वाचा… ठाणे : धार्मिक स्थळांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष

पाचपखाडी भागातील सिद्धेश्वर तलावेतील रस्त्यालगतची संरक्षण भिंत कोसळली असून यामुळे रस्त्याच्या काही भाग खचला आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. सकाळी ८.३० वाजेनंतरही शहरात पाऊस सुरूच असला तरी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे सखल भागात साचलेले पाणी काहीसे ओसरताना दिसून येत आहे. पावसादरम्यान शहरातील महामार्गांवर वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले.