ठाणे :आताच्या पिढीला पर्यावरणाचे महत्त्व समजावे, त्यांच्यात पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी शालेय वयापासून मुलांमध्ये पर्यावरण जागृकता निर्माण होणे गरजेचे आहे.यासाठी उन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून वनशक्ती संस्था आणि महाराष्ट्र राज्य वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी शिबिर २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर मानपाडा निसर्ग परिचय केंद्र येथे पार पडले. अगदी निसर्ग भ्रमंती पासून ते पर्यावरणाशी संबंधीत विविध विषयांवर कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या.

शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या नंतर पालकांना मुलांचा वेळ कशात गुंतवायचा असा प्रश्न पडतो. यासाठी काही पालक कलेशी निगडीत असलेल्या प्रशिक्षण केंद्रात मुलांना पाठवतात. तर, काही संस्थांकडून उन्हाळी शिबिराचे आयोजन केले जाते या शिबिरात विविध खेळ घेतले जातात. परंतू, यात काही शिबीर असे असतात की, जे मुलांना शालेय वयात जागृक व्हायला शिकवतात. यातील एक म्हणजे वनशक्ती संस्था आणि महाराष्ट्र राज्य वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले उन्हाळी शिबीर आहे. या संस्थेमार्फत गेले अनेक वर्षे शालेय विद्यार्थ्यांसाठी आगळ्यावेगळ्या उन्हाळी शिबिराचे आयोजन केले जाते. यात, विद्यार्थ्यांना निसर्ग भ्रमंती ला घेऊन गेले जाते. याठिकाणी विद्यार्थ्यांना विविध प्रजातींच्या झाडांची ओळख, महत्त्व त्याचे औषधी गुणधर्म समजावले जातात. तसेच पर्यावरणाशी निगडित अनेक उपक्रम देखील राबविले जातात.

यंदाही या संस्थेमार्फत उन्हाळी शिबिरीचे आयोजन करण्यात आले होते. वयवर्षे ८ ते १४ वयोगटातील २८ विद्यार्थ्यांनी सहा दिवसांच्या या उन्हाळी शिबिरात सहभाग घेतला होता. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध निसर्गस्नेही उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये निसर्गभ्रमंती, रोपांची लागवड व पुनर्लागवड कार्यशाळा, जपानी पद्धतीचे कोकेडामा बनवण्याचे प्रशिक्षण, नैसर्गिक वस्तूंपासून खेळणी बनवणे, वारली चित्रकला, कागदाच्या पिशव्या बनवणे, कापडी चित्रकला तसेच पर्यावरण विषयक खेळ आणि वनभोजन यांचा समावेश होता.या शिबीराचा समारोप आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ गुरुवारी पार पडला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटीचे माजी प्राध्यापक प्रा. अरुण इनामदार हे उपस्थित होते. या समारंभात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. निसर्ग संवर्धनाची शपथ या शिबिरादरम्यान सहभागींमार्फत घेण्यात आली.

भविष्यातील पिढ्यांसाठी जंगलं जपली पाहिजे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण झाडे लावू शकतो, पण आपण जंगल तयार करू शकत नाही. ही नैसर्गिक संपत्ती म्हणजे खरा खजिना आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी आपण ही जंगलं जपली पाहिजेत. वनशक्तीच्या उन्हाळी शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांना या खजिन्याची ओळख करून देणे आणि पर्यावरणीय मूल्ये त्यांच्या मनात बिंबवणे हाच आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली.