कल्याण – अक्षय तृतीयेचा मुहूर्त. या मुहूर्तावर असलेले विवाह सोहळे, देवधर्मांचे कार्यक्रम, प्राणप्रतिष्ठा सोहळे आणि इतर धार्मिक कार्यक्रम. आणि सुट्टीमुळे नवी मुंबई, ठाणे, शिळफाटा, कल्याणमधील माॅलमधील खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक. त्यामुळे एकावेळी शेकडो वाहने एकाचवेळी रस्त्यावर आली. याच कालावधीत शिळफाटा, काटई, बदलापूर रस्त्यावर वाहन बंद पडल्याने बुधवारी संध्याकाळपासून नवी मुंबई महापे, मुंब्रा, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील सर्व मुख्य वर्दळीचे रस्ते वाहतूक कोंडीत अडकले.
त्यामुळे अनेकांना विहित वेळेत कार्यक्रमांच्या ठिकाणी पोहचता आले नाही. वाहन कोंडीमुळे वाहनात एकाचवेळी अर्धा अर्धा तास खोळंबुन राहावे लागत असल्याने बस, खासगी वाहनांमधील प्रवाशांचे हाल झाले. गरमाईने अगोदरच हैराण नागरिक कोंडीमुळे त्रस्त होते. वाशीहून संध्याकाळी सहा वाजता सुटलेली नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बस कल्याणला पोहचण्यासाठी रात्री अकरा वाजले.
अशाप्रकारेच कल्याण डोंबिवली पालिका परिवहन, नवी मुंबई पालिका परिवहन, ठाणे परिवहन उपक्रमाच्या बस, एसटीच्या बस आणि इतर खासगी वाहने जागोजागी महापे, मुंब्रा, शिळफाटा, काटई-बदलापूर रस्त्यावर बुधवारी रात्री अडकून पडली होती.
वाहतूक पोलीस कोंडी सोडविण्यासाठी अथक प्रयत्न करत असताना उलट मार्गिकेतून येणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहन चालकांनी कोंडीत आणखी भर घातली होती. वाहतूक पोलीस या बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी धावत होते.
कोळे येथे वाहन बंद
कोळे येथे बुधवारी संध्याकाळी एक अवजड वाहन बंद पडले होते. काटईहून बदलापूर, अंबरनाथ, तळोजा दिशेने जाणारी आणि येणारी वाहने कोळे, काटईनाका परिसरात अडकून पडली. या रखडलेल्या वाहनांच्या मागे मग काटई, शिळफाटा, कोळेगाव रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. बदलापूरकडे जाणारे दोन्ही रस्ते या बंद वाहनामुळे कोंडीत अडकले.
मुंब्रा येथे कोंडी
शिळफाटालगतचा कल्याण फाट्याजवळील मुंब्रा दिशेने जाणारा रस्ता संध्याकाळपासून जाम झाला होता. उड्डाण पुलाच्या दोन्ही मार्गिका कोंडीमुळे जाम झाल्या होत्या. शिळफाटा चौक ते मुंब्रा दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागीचे रस्ता दुभाजक स्थानिक व्यापारी, पेट्रोलपंप चालक यांनी आपल्या दुकानात, पेट्रोलपंपावर तात्काळ ग्राहक यावेत म्हणून फोडून टाकले आहेत. या फोडलेल्या रस्ता दुभाजकाच्या मध्यभागातून दुचाकी स्वार मनमानी पध्दतीने घुसून दररोज वाहतूक कोंडी करतात. त्यामुळे एमएसआरडीसीने या भागात मजबूत रस्ता दुभाजकांची पुनर्बांधणी करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
डोंबिवलीत परिचारिका असलेल्या प्रेयसीचा खून करणाऱ्या ठाकुर्लीतील इसमाला अटक
शिळफाट्या जवळील मुंब्रा महापे वळण रस्ता अवजड, जड वाहनांनी कोंडीत अडकला होता. दहा वाजण्यापूर्वीच अवजड, जड वाहने या वर्दळींच्या रस्त्यांवर दिसत होती. महापेकडून येणारी वाहने शिळफाटा खिंड भागातील वाहनांच्या रांगामुळे, कोंडीमुळे महापे चौकापर्यंत अडकून पडली होती. या कोंडीत रुग्णवाहिका मिळेल त्या मार्गाने धावत असल्याचे दृश्य होते.
अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सर्वत्र कार्यक्रम असल्याने नागरिक एकावेळी वाहनांनी रस्त्यावर आले. त्यात शिळफाटा, कोळे रस्त्यावर वाहन बंद पडली. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावर कोंडी होती. – सचिन सांडभोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक विभाग