डोंबिवली एमआयडीसीतील बंद असलेल्या विजय पेपर प्राॅडक्ट कंपनीमधील सुरक्षारक्षकाची हत्या करून फरार झालेल्या एका आरोपीला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने अटक केली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना मानपाडा पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या तीन इतकी झाली आहे.
संतोष बाळासाहेब शिर्के (वाहन चालक, रा. नेतिवली नाका, कल्याण पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो नेतिवली येथील रहिवासी संजय जाधव (मु. पाडे, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्या खोलीत लपून बसला होता. कल्याण गुन्हे शाखेचे हवालदार मिथुन राठोड यांना सुरक्षारक्षक ग्यानबहादुर गुरूम यांच्या हत्येमधील एक आरोपी कल्याण पूर्वेतील नेतिवली नाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी सापळा रचुन आरोपी संतोष शिर्के याला पकडले.
पोलिसांनी नेतिवली ते विजय पेपर प्राॅड्क्ट कंपनी दरम्यानचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये एका रिक्षेतून चार जण प्रवास करत आहेत. ही रिक्षा विजय पेपर कंपनी जवळ आल्यानंतर त्यामधील चार जण रिक्षेमधून उतरतात. कंपनीच्या संरक्षित भिंतीवर चढून कंपनीच्या आवारात उड्या मारत असल्याचे दिसले होते. या माहितीच्या मानपाडा पोलिसांनी टोनी डिसिल्व्हा आणि भंगार विक्रेता फिरोज खान याला अटक केली आहे. भंगार चोरीच्या उद्देशातून ही हत्या करण्यात आली आहे, अशी कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
चोरी करताना मोठ्याने आवाज झाला. त्यावेळी सुरक्षारक्षक ग्यानबहादूर जागा झाला. त्याने चोरट्यांना विरोध केला. चोरट्यांनी लोखंडी सळई सुरक्षारक्षकाच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली आहे. टोनीचा मावस भाऊ सुनील वाघे याचाही या चोरी प्रकरणात सहभाग आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींनी कंपनीतील दीड लाखाचे भंगार चोरून नेले होते. ते कोळसेवाडीतील भंगार विक्रेता फिरोज खानला १० हजार रूपयांना विकले होते. फिरोजला पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण शीळफाटा, दहिसर मोरी, डायघर भागात भंगार विक्रेत्यांची मोठी दुकाने गेल्या तीन वर्षापासून सुरू झाली आहेत. कुर्ला भागातून हटविण्यात आलेले हे भंगार विक्रेते आहेत.