अंबरनाथ शहरात एकाच दिवसात भरधाव वेगामुळे दोन कारचे अपघात झाल्याचे समोर आले आहे. यातील एका अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी आहे. हा अपघात अंबरनाथच्या वेशीवर जुन्या कचराभूमीसमोर झाला. तर दुसरा अपघात पश्चिमेतील तहसिलदार कार्यालयाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झाला. या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या कारच्या चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत कामगार घरी सामान बांधण्यासाठी आले आणि चोरी करुन गेले

मंगळवारी रात्रीच्या सुमारास पांढऱ्या रंगाची एक व्हॅगन आर कार भरधाव वेगाने काटई कर्जत राज्यमार्गावरील टी जंक्शन चौकाकडून कल्याण बदलापूर राज्यमार्गावरील फॉरेस्ट नाक्याकडे जोडरस्त्याने जात होती. यावेळी कारचालकाचे नियंत्रण सुटून या कारने आधी विद्युत खांबाला धडक दिली आणि मग थेट विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत जाऊन उलटली. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा >>> कल्याण: ५४ दिवसांच्या शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणाला यश, शिळफाटा रस्ता बाधितांना भरपाई देण्याच्या हालचाली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारमधील अन्य एक प्रवासी गंभीर जखमी असून त्याच्यावर उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अंबरनाथ पश्चिमेच्या तहसीलदार कार्यालयाजवळ मंगळवारी मध्यरात्री एक भरधाव कार झाडावर जाऊन धडकली. या कारमध्ये असलेले चारही जण कारमधील सुरक्षा यंत्रणेमुळे किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी गाडीच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. गाडीतील चौघेही उल्हासनगरचे राहणारे असून त्यांनी बदलापूरला जाण्यासाठी भाडेतत्वावर वाहन घेतले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास ते बदलापूरहून उल्हासनगरला परतत असताना चालकाला डुलकी लागली आणि भरधाव वेगात असलेली कार ही थेट एका झाडाला जाऊन धडकली.